महाराष्ट्रातील राजकारणात जवळपास तीस वर्ष आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमविणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री पतंगराव कदम यांची आज ८१ वी जयंती. ८१ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ८ जानेवारी १९४४ रोजी पतंगराव कदम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावात एका गरीब कुटुंबात झाला.
त्यांचे चौथी पर्यंतचे शिक्षण गावातल्या शाळेत झाले तर सातवी पर्यंतचे शिक्षण शिरसगाव या गावात झाले. ११ वी पर्यंतचे शिक्षण म्हणजे त्या काळातील मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण त्यांनी कमवा व शिका योजनेअंतर्गत पूर्ण केले. एफ. वाय बी. ए नंतर त्यांनी टीचर्स डिप्लोमा पूर्ण केला व शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बांधून पुणे गाठले. पुण्यातील हडपसर येथे दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीत राहून त्यांनी गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्याचे काम सुरू केले. शिक्षक असतानाच गोरगरिबांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी काही तरी करावे असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला त्यातूनच , भारती विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली गेली. बा. ग पवार, वसंतराव म्हेत्रे, महादर सर, नीलाखे सर अशा पाच लोकांना घेऊन त्यांनी १० मे १९६४ रोजी भारती विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्या खिशात अवघे ३८ रुपये होते.
हळूहळू भारती विदयापीठाचा विस्तार वाढू लागला. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही भारती विद्यापीठाच्या पाट्या झळकू लागल्या. भारती विद्यापीठामुळे गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजीतून शिक्षण मिळू लागले. सर्वसामान्य कुटुंबातील मुले उच्च शिक्षण घेऊ लागली. त्यांनी लावलेल्या भारती विद्यापीठाच्या रोपट्याचे आज वटवृक्ष बनले आहे. के.जी ते पी.जे असे सर्वप्रकारचे शिक्षण आज भारती विद्यापीठातून मिळत आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य महान असेच आहे.
भारती विद्यापीठाचा पसारा सांभाळीत त्यांनी राजकारणातही ठसा उमटविला. १९६८ साली एस टी महामंडळाच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली. गाव तिथे एस टी ही योजना राबवून त्यांनी गावागावात एस टी पोहचवली. १९८५ साली त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. १९९० सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसने त्यांना तिकीट दिले तेंव्हापासून १९९५ सालचा अपवाद वगळता ते सतत निवडून आले. २०१४ साली मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला पण त्यांनी आपला गड राखला. या दरम्यान त्यांनी शिक्षण, सहकार, उद्योग, महसूल, वन या महत्वाच्या खात्याची मंत्रीपदे सांभाळली. इतकी वर्ष मंत्रीपदावर राहूनही त्यांच्यावर एकही आरोप झाला नाही यातच त्यांचा कारभार किती पारदर्शक होता, हे दिसून येते.
काँग्रेस पक्षावर त्यांची नितांत श्रद्धा होती. सत्ता असो वा नसो काँग्रेस पक्षाशी ते कायम एकनिष्ठ राहिले. प्रत्येकवेळी मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत त्यांचे नाव कायम चर्चेत असायचे, पण दुर्दैवाने ते मुख्यमंत्री बनू शकले नाही. तरीही त्यांनी याबाबत कधीही जाहीर नाराजी व्यक्त केली नाही. पक्ष सोडण्याचा विचारही त्यांच्या मनात कधी आला नाही. आजच्या आयाराम गयाराम संस्कृतीत पतंगरावांची निष्ठा उठून दिसते. पतंगराव तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहेत.
बेधडक आणि मनमोकळा स्वभाव हे त्यांचे वैशष्ट्य होते. ओठात एक आणि पोटात एक असे पतंगरावांच्या बाबतीत कधीच झाले नाही. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणण्याची त्यांची वृत्ती राजकारणात अभावानेच पाहायला मिळते. त्यांचे भाषण म्हणजे पर्वणीच. त्यांच्या भाषणात गावाकडचा रांगडेपणा असायचा. कार्यकर्त्यांचा गराडा कायम त्यांच्यासोबत असायचा. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पतंगरावांनाच बोलवायचे असा कार्यकर्त्यांचा आग्रह असायचा.
त्यांच्या कामाचा धडाका देखील जबरदस्त असायचा. आपल्या मतदारसंघात त्यांनी कामाचा डोंगर उभा केला होता. आपल्या मतदारसंघात एमआयडीसी उभारून त्यांनी अनेक उद्योगधंदे आणले. सूत गिरण्या, साखर कारखाने, वाईन पार्क, भारती विद्यापीठ, भारती हॉस्पिटल उभारून मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती केली. त्यांच्या कामाचा झपाटा इतका असायचा की, एकदा पु. ल. देशपांडे म्हणाले की, हे पतंगराव नव्हेत तर रॉकेटराव आहेत. पतंगराव कदम यांनी सहकार क्षेत्रातही आपला ठसा उमटविला. ९ मार्च २०१८ रोजी पतंगराव कदम यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक असामान्य व्यक्तिमत्व काळाच्या पडदयाआड गेले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली. पतंगराव कदम यांना ८० व्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *