कल्याण : “इयत्ता तिसरीच्या वर्गातील मराठी विषयातील “वासाची किंमत” या चित्रकथेवर आधारित अजय पाटील यांनी पटकथा, संवाद, कॅमेरा, एडिटिंग, दिग्दर्शन असे पंचरंगी भूमिका सादर करून अत्यंत सुंदर पद्धतीचा लघुपट शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे,” असे गौरव उद्गार डायटचे प्राचार्य संजय वाघ यांनी काढले. नुकताच “वासाची किंमत” या लघुपटाचे उद्घाटन संजय वाघ यांच्याहस्ते जिल्हा डाएट शिक्षण प्रशिक्षण सभागृह राहटोली बदलापूर येथे ठाणे जिल्ह्यातून आलेल्या विषय तज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर डाएट प्राध्यापक खरोटमल, कुमार पाटील, लेखक दिग्दर्शक अजय पाटील, या लघुपटात अभिनय करणारे विद्या शिर्के, करण राजपूत, पांडुरंग पाटील, रणजित पाटील आणि बालकलाकार आदिती पाटील हे उपस्थित होते. संजय वाघ पुढे म्हणाले की, “ही नवनिर्मिती असून या नव्या निर्मितीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या लघुपटाचा फायदा होणार आहे. दृश्य माध्यम मुलांना निश्चितच अध्ययन प्रकिया समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे.
शिवानीच्या धाडसाची, बुद्धिमत्तेची आणि कल्पकतेची कथा या लघुपटात दाखवलेली आहे. लहान मुलं सुद्धा समाजामध्ये वावरत असताना जशास तसे कसे वागतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे “वासाची किंमत” हा लघुपट आहे. वैजोळ शाळेत शिकणाऱ्या आदिती पाटील या विद्यार्थ्यीनीने अत्यंत उत्तम पद्धतीने भूमिका शिवानीची भूमिका साकारली आहे. अजय पाटील त्याचबरोबर सर्व कलाकारचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.” असे हे गौरव उद्गार वाघ यांनी काढले.
खरोटमल यांनी सर्व कलाकारांचे कौतुक करून ही एक नवनिर्मित असून सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल आणि अत्यंत उत्तम पद्धतीने फिल्म तयार केल्याचे सांगितलं.
लेखक दिग्दर्शक अजय पाटील यांनी सांगितलं की, हा लघुपट बनवताना इयत्ता तिसरीतील “वासाची किंमत” या चित्रकथेवर आधारित लघुपट बनवलेला असला तरीसुद्धा यामध्ये अनेक बारकावे घेण्यात आलेले आहेत. यामध्ये शेतीच्या कामात मदत करणारी शिवानी, खेळ, हसणं, अभ्यास आणि एकट्याने बाजारामध्ये अत्यंत बिंधासपणे वावरताना स्वतःची काळजी घेणं. समाजामध्ये जर आपल्याला कोणी फसवत असेल, ठकवत असेल तर त्यालाही त्याच भाषेत उत्तर कसे द्यावे, असा सर्वांगीण विचार करून हा लघुपट केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण राजपूत तर आभार प्रदर्शन पांडुरंग पाटील यांनी केले.
00000