ठाणे : जगातील मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आज शिल्लक राहिलेला दिसत नाही, ही एक शोकांतिका आहे. मात्र समाज माध्यमे ही पावरफुल आहेत. या माध्यमांचा वापर करणे गरजेचे आहे. व्हाट्सअपवर कधीही चुकीचे मेसेज टाकू नका. आपल्या डोक्याचा ताबा दुसऱ्याला कधीही द्यायचा नाही. सध्या व्हाट्सअप व फेसबुकची दुनिया आहे. आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. प्रसारमाध्यमे हीच समाजाचा आरसा आहेत, असे मत मुंबई विद्यापीठाच्या मराठी पत्रकारीतेच्या प्राध्यापिका नम्रता कडू यांनी व्याख्यान देताना व्यक्त केले.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सत्यशोधक स्टडी सर्कलतर्फे मराठी पत्रकार दिनानिमित्त, ‘आजची स्थिती व पत्रकारिता’ या विषयावर नुकतेच एमएच हायस्कूलमध्ये व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक स्टडी सर्कलचे संघटक व ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर हे होते, सहसंघटक विजय तांबट, अशोक मोहिते, निरंजन थोरात, सलमान पठाण, निमंत्रक मारुती विश्वासराव, सतिश अहिरे, दामोदर बेहेरे, प्रमोद तामसे, राज पंडित, प्रकाश आमकर, सचिन पाटेकर, मंगेश पवार, प्रमोद आर्डे, किशोर आर्डे, राजेश आर्डे, उमेश आर्डे, अमित आमकर, स्वप्नील आमकर. छाया ठाणेकर, अभय ठाणेकर, श्रुती ठाणेकर, अभिषेक ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. नम्रता कडू मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की, ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वर्तमानपत्र सुरू केले. इंग्रजांना आपली भूमिका कळावी म्हणून जांभेकर यांनी दर्पण पेपरमध्ये एक इंग्रजीचे पान देखील सुरू केले. ते गणिताचे प्राध्यापक होते तर त्यांचे १० ते १२ भाषेवर चांगले प्रभुत्व होते. पूर्वी टीका करणारी पत्रे छापली जात होती, आज स्तुतींची पत्रे छापली जातात. पूर्वीच्या काळात नैतिकता होती, आज ती दिसत नाही. हार घालून कोणी मोठे होत नाहीत, तर महापुरुषांच्या विचारांची कृती करा. भारतात १९४८ सालीलोकसत्ता हे भांडवलदाराचे पाहिले वृत्तपत्र सुरू झाले. १९९२ साली खाऊजा धोरण आले. वृत्तपत्राचा बातमी हा आत्मा असावा, पूर्वी ७० टक्के बातम्या व ३० टक्के जाहिराती होत्या. आज ७० टक्के जाहिराती व ३० टक्केच बातम्या शिल्लक राहिल्या आहेत. वृत्तपत्रांमधून जनसामान्यांचे प्रश्न मांडताना दिसत नाहीत, शेतकरी कामगार ऐवजी राजकारण्यांच्या प्रश्नांना जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सध्याचे चित्र निराजनक आहे. सरकारी जाहिराती मिळवण्यासाठी सर्व वृत्तपत्र मालकांचा खटाटोप चालू असतो. आता जाहिराती हा वृत्तपत्राचा कणा झाला आहे. आज ९५ टक्के उद्योगपतींकडे प्रसार माध्यमांची मालकी आहे. सर्व वृत्तपत्र ही आपली टीआरपी वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. भारतात १७ वृत्तपत्रे, एक लाख मासिक तर एक हजार चॅनलमध्ये १७८ न्यूज चॅनेल आहेत. माध्यमांची गळचेपी होताना दिसत असून, प्रसार माध्यमांना आज स्वातंत्र्य नाही. सरकारच्या विरोधात बातम्या द्यायच्या नाहीत, असे जणू काय संकेत आहेत. आज-काल बातम्या जाहिरातीच्या स्वरूपात व जाहिराती बातम्यांच्या स्वरूपात आहेत. पत्रकारांना पगार व मानधन योग्य प्रकारे मिळत नसून त्यांच्यावर जाहिराती आणण्याचा दबाव टाकला जातो. आजच्या परिस्थितीमध्ये सर्वांनी जागरूक असणे ही काळाची गरज आहे. जेष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित सर्वंकष माहिती दिली. सत्यशोधक स्टडी सर्कलतर्फे दर महिन्यातून एकदा विविध विषयांवर व्याख्यानाचे आयोजन केले जाणार आहे. तरी अभ्यागतांनी या संधीचा उपयोग करुन घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रश्न उत्तरे होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
चौकट
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कार्जिर्डा गावातील जामदा धरणाच्या ३० वर्षातील संघर्षाची माहिती यावेळि देण्यात आली. तसेच ग्रामस्थ, ग्रामपंचायत समिती सदस्य व अधिकारी यांच्या संयुक्त समितीच्या चर्चेत, भूमी संपादन अधिनियम २०२३ नुसार तीनही अनुसूचींतील ४४ तरतुदींनुसार योग्य पुनर्वसन करण्यात यावे व किमान एक एकरला एक कोटीची भरपाई देण्यात यावी तसेच भूसंपादनाची जागा ग्रामस्थांना विश्वासात घेऊन निश्चित करण्यात यावी. या प्रक्रिया पार पाडल्यानंतरच धरणाचा निर्णय घेण्यात यावा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रथम पुनर्वसन व नंतरच धरण याची अंमलबजावणी शासन, प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी करावी अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, स्थानिक आमदार किरण सामंत यांची भेट घेण्यात येऊन त्यांना शेतकरी सेवा संघाच्या वतीने निवेदन दिले जाणार आहे.
