अपघातानंतर मनसेसह इतर पक्ष आणि सामान्य नागरिकांनी केला रास्ता रोको
कल्याण : कल्याणमध्ये भरधाव डंपरने मायलेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात माय लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड येथे श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर चौकामध्ये हा अपघात घडला आहे. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडलेल्या या अपघातात ठाणकरपाडा श्री समर्थ अष्टविनायक चाळीत भाड्याने राहणाऱ्या निशा सोमेस्कर (35) वर्ष आणि तीन वर्षाचा चिमुकला अंश सोमेस्कर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. नर्सरी शाळेतून घरी जात असताना रस्ता क्रॉसिंगच्या वेळी डंपरने त्यांना उडवले.
कल्याण डोंबिवली महापालिकेचा डेबरीज उचलणाऱ्या डंपरने हा अपघात केला असून डंपरच्या ड्रायव्हरला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तर महापालिकेने येथील डीवायडर काढल्याने हा अपघात घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर हा अपघात झाला तेव्हा निशा यांचे पती अमित सोमेस्कर हे कामानिमित बंगलोर येथे गेले होते. अपघाताची माहिती मिळताच ते तातडीने कल्याणच्या दिशेने निघाले आहेत. तर या घटनेमुळे ठाणकर पाडा परिसरात चाळीतील नागरिक आणि नातेवाईक यांच्यावर दुख्खाचा डोंगर कोसळला असून रुक्मिणीबाई रुग्णालयात नगरिकांनी गर्दी केली होती.
या अपघातामुळे पदाचारी रस्ता ओलांडणे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहाजानंद चौक, गुरूदेव हाँटेल चौक, लाल चौकी चौक आदि परिसरातील सिग्नल यंत्रणासह झेब्रा क्राँसिंग प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज देखील कल्याण डोंबिवली शहरात स्टेशन परिसरात सँटिस् काम, तर बहुतांश मुख्य रस्त्यावर सुरु असलेल्या मेट्रो चे काम आणि समन्वयचा अभाव यामुळे आणि मुख्य रस्त्यावर दिवसा धावणारे अवजड वाहने हे घटक देखील अपघाताला कारणीभूत ठरत असल्याची ओरड सर्वसामान्य यानिमित्ताने करीत आहेत. तर या घटनेनंतर मनसे, भाजपा, शिवसेना शिंदे गट या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रस्त्यावर रास्तारोको करीत केडीएमसी प्रशासन आणि वाहतूक विभागाचा निषेध नोंदवला.
माजी आमदार प्रकाश भोईर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली की, अपघाताची घटना घडून तासभर होऊन देखील मनपाचा एकही आधिकारी येत नसेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे. हे डिव्हाईडर काढले नसते तर ही घटना घडली नसती. सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी, सातत्याने कल्याण शहरात घटना घडत आहेत. पत्रीपुल येथील घटनेत सहाजणांना जीव गमवावा लागला, आता पुन्हा येथे दोन जणांचा जीव गेला. वाहतूक नियंत्रक आधिकारी सातत्याने या रस्त्यावर हजर पाहिजेत. सगळ्यात जास्त शाळा या परिसरात असून लहान मुले या परिसरातून शाळेत ये जा करीत असतात येथे सिग्नल यंत्रणा वाहतूक कर्मचारी सातत्याने राहणे आवश्यक असल्याची मागणी प्रकाश भोईर यांनी केली.
याबाबत मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी तीव्र संताप व्यक्त करीत कल्याण डोंबिवली मनपाला कोणी मेल्यानंतरच जाग येते. सर्व पक्षीय लोकं या रस्त्यावर उतरलो जो पर्यंत या रस्त्यावर डिव्हाईडर होत नाहीत तो पर्यंत एकाही आधिकार्याला खुर्चीवर बसू देणार नाही. एमएसआरडीसी अधिकारी, मनपा अधिकारी यांना ताबोडतोब निलंबित करा, आणि कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने अपघात ग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी केली.
तर ज्या ठिकाणाचे डिव्हाईडर काढले आहेत ते डिव्हाईडर बसविण्याचे काम तातडीने सूरू केले असून ज्या ठिकाणी ब्रेकर वैगरे आवश्यक आहेत ते देखील करणार असल्याचे कल्याण डोंबिवली मनपा कार्यकारी अभियंता बांधकाम जगदीश कोरे यांनी सांगितले.