भारतीय शेअर बाजार हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या बाजारांपैकी एक आहे. येथे देश-विदेशातील गुंतवणूकदारांची उत्सुकता सतत वाढत आहे. विशेषत: शेजारी चीनमधील गुंतवणूकदारही भारतीय कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. चीनची मध्यवर्ती बँक असलेली ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ (पीबीओसी) भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. या बँकेने 2024 च्या अखेरीस 35 भारतीय कंपन्यांमध्ये 40 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.
चीनमधून येणारे 17 विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) भारतात नोंदणीकृत आहेत. त्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनसारख्या मोठ्या सरकारी संस्थांचाही समावेश आहे. या कंपन्या जागतिक स्तरावर 870 अब्ज डॉलर किमतीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतात. भारतीय शेअर बाजारात ‘पीबीओसी’ने आयसीआयसीआय बँकेत सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. चीनच्या या सेंट्रल बँकेने ‘आयसीआयसीआय’ बँकेचे 6,139 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. त्याच वेळी या बँकेने एचडीएफसी बँकेमध्ये 5,344 कोटी रुपयांची हिस्सेदारीही घेतली आहे. याशिवाय ‘पीबीओसी’ने सरकारी ‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन’मध्ये 1,414 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ मध्ये या बँकेची 3,619 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. याशिवाय कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि बजाज फायनान्समध्येही 1,500 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे.
‘पीबीओसी’ची मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि अल्ट्राटेक सिमेंट यासारख्या कंपन्यांमध्ये 1,100 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आहे. याशिवाय चीनच्या बँकेने बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स आणि पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्समध्येही हिस्सा घेतला आहे. चीनच्या या मोठ्या गुंतवणुकीमुळे जगाचे लक्ष भारतीय शेअर बाजाराकडे लागले आहे; मात्र या गुंतवणुकीसोबतच दोन्ही देशांमधील राजकीय आणि आर्थिक संबंधांबाबतही चर्चा झाली आहे. भारतीय कंपन्यांमधील पीबीओसीची ही गुंतवणूक दर्शवते की भारतीय बाजारपेठ केवळ उदयास येत नाही, तर जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे.