लाच घेताना झाली होती अटक
अशोक गायकवाड
पनवेल : तळोजा तुरुंगाधिकाऱ्यांना लाच घेताना झाली होती अटक. याप्रकरणी दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. जयराज वडणे यांनी तुरुंगाधिकारी निवृत्ती कन्नेवाड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत असल्याचे घोषित करताच त्यांची पुन्हा ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
दिनेश दिलीप पवार याच्याविरोधात घाटकोपर पंतनगर पोलिस ठण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने त्याला तळोजा कारागृहात ठेवले आहे. आरोपीला उत्तम वर्तन आणि सेवा पुरवण्यासाठी कारागृहातील पोलिस हवालदार राहुल गरड आणि वरिष्ठ तुरुंगाधिकारी निवृत्ती कन्नेवाड यांनी लाचेची मागणी केली होती. त्यानुसार आरोपीने हा निरोप त्याच्या भावाकडे पाठविला. तेथून मुंबई लाच लुचपत विभागाची चक्रे फिरली आणि लावलेल्या सापळ्यात १३ डिसेंबरला राहुल गरड याला रंगेहाथ पकडले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाच लुचपत खात्याने तुरुंगाधिकारी कन्नेवाड यांच्याकडे मोर्चा वळविला आणि दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. त्यांना पनवेल विशेष सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर ४ दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली होती.
त्यानुसार त्यांना माटुंगा पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत ठेवून तपास करण्यात आला. पोलिस कोठडीची मुदत संपुष्टात येताच त्याला पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर १७ डिसेंबरपासून दोघेही ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहाच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, तुरुंगाधिकारी निवृत्ती कन्नेवाड यांनी पनवेल विशेष सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार मंगळवारी (दि .०६ जानेवारी २०२४ ) रोजी न्या. जयराज वडणे यांच्या समोर जामीन अर्जावर सुनावणी झाली. मुंबई लाच लुचपत खात्याने काही शंका व्यक्त करून कन्नेवाड यांचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली.
१. सरकारी अभिवक्ता वाय. एस. भोपी यांनी तळोजा तुरुंगात सुरु असलेला गैर आर्थिक व्यवहार आणि सामान्य घरातील आरोपींना भेटताना त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास विषद केला.
२. बड्या घरातील आरोपींकडून पैसे घेवून त्यांना कारागृहात फाईव्ह स्टार सुविधा देताना कन्नेवाड यांना लोकसेवक अधिकाराचा विसर पडला आणि त्यांनी आरोपीकडून पैसे घेवून त्याला सुविधा पुरवून कारागृहाच्या कामकाजाला काळिमा फासला असल्याचे युक्तिवादातून भोपी यांनी न्या. वडणे यांच्या निदर्शनास आणून दिले.