शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र

कल्याण : कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांना पत्र दिले आहे.
किल्ले दुर्गाडी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्थान आहे. त्या स्थानामुळेच कल्याण शहराला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. किल्यावरील दुर्गा देवी हे अत्यंत जागृत दैवत आहे. हे दैवत कल्याणकरांचे ग्रामदैवत, कुलदैवत आहे. त्यामुळेच या पवित्र स्थानाने सर्व कल्याणकरांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. किल्ले दुर्गाडी ही सरकारी मालमत्ता आहे असा न्यायालयाने नुकताच निर्णय आदेश दिलेला आहे. या आदेशा नुसार किल्ले दुर्गाडी जागेचा संपूर्ण कब्जा सरकारकडे आला आहे.
किल्ले दुर्गाडी हे स्थान कल्याणकरांसाठी एक श्रध्देचा व प्रेरणेचा विषय आहे. त्यामुळे किल्ले दुर्गाडी व त्या सभोवतीच्या परिसराचे नुतनीकरण करुन ते एक पर्यटन स्थळ होईल असे सुंदरीकरण व्हावे अशी सर्व कल्याणकरांची इच्छा आहे. सध्या किल्ले दुर्गाडीच्या बुरुजाचे काम सुरु आहे. नंतर मंदिराच्या चौथऱ्याचे काम होणार आहे असे समजते. परंतु असे थोड्या थोड्या भागाचे डागडुजीचे काम न करता संपूर्ण किल्याचा रचनाकाराकडून एक सुंदर आराखडा तयार करुन त्याप्रमाणे एक सुंदर कलाकृती कशी निर्माण होईल याबाबत विचार करुन आदर्शवत काम करावे.
महापालिकेकडून असे सुंदर स्थान निर्माण झाले तर कल्याणकर सदैव महानगरपालिकेचे व आपले ऋणी राहतील. सध्या दुर्गाडीच्या गेटला संपुर्ण तडे जाऊन ते जीर्ण झालेले आहे, दुर्गादेवीच्या मंदिराचा चौथरा घुशींनी पोखरलेला आहे, चौथऱ्यावरील लाद्या संपूर्ण तुटलेल्या आवस्थेत आहेत. चौथऱ्याला तटबंदी नसल्यामुळे तो ढासळण्याच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत असलेला छत्रपतींचा किल्ला पाहुन मनाला फार वेदना होत असतात. त्यामुळे हा विषय कल्याणकरांच्या श्रध्देचा व भावनीक आहे याचा विचार करुन संपूर्ण लक्ष घालावे व ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीची अप्रतिम नुतन कलाकृती निर्माण करावी अशी मागणी शिवसेना उपनेता विजय साळवी यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *