सहा महिन्यांच्या बाळाला विषाणूची लागण ० सरकारकडून खबरदारी
मुंबई : मुंबई, ठाणेकरांनो सावधान ! मुंबईत एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण आढळलाय. पवईमध्ये हिरानंदानी रुग्णालयात आज ह्युमन मेटाप्युमो म्हणजेच एचएमपीव्ही व्हायरसची सहा महिन्यांच्या बाळाला लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. खोकला आणि ऑक्सिजनची पातळी ८४ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याने या बाळाला १ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान रुग्णालयाची डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या विषाणूवर कोणतेही विशिष्ट उपचार नसल्यामुळे बाळावर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्सच्या लक्षणांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी स्थानिक प्रशासनाला १ जानेवारी रोजी एचएमपीव्ही रुग्णाबाबत कल्पना दिली होती. परंतु परळ येथील बीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना अद्याप असा कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
चीनमध्ये सध्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू असल्याने, देशातही याला विषाणूला रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नेटवर्क लॅबोरेटरीजच्या नियमित तपासणी दरम्यान देशातील काहींना या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त पाहाणी पथकाची स्थापना केली आहे. हे पथक जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी चिनमधील परिस्थितीबद्दल माहिती घेत आहे.