मुंबई : ड्रीम ११ कप क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणे म्हणजे तुम्हाला आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे. अशा संधी आयुष्यात फार कमी वेळा मिळतात कारण या स्पर्धेमुळे तुम्हाला चांगल्या खेळपट्ट्यांवर खेळण्याची संधी तर मिळतेच शिवाय कितीतरी माजी क्रिकेटपटू आणि एम.सी.ए. तील पदाधिकाऱ्यांसमोर आपला सर्वोत्तम खेळ करण्याची संधी तुम्हाला मिळते. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात छोट्या खेळाडूंना संबोधित करताना सांगितले. ओव्हल मैदान, चर्चगेट येथे झालेल्या या समारंभात एम.सी.ए.चे उपाध्यक्ष संजय नाईक यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना वेंगसरकर हे मुंबईतील छोट्या खेळाडूंसाठी करीत असलेले कार्य खरोखरच गौरवास्पद असल्याचे सांगितले. या स्पर्धेत जी.पी.सी.सी.-डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय संघाने अमेय क्रिकेट अकादमी संघावर ८० धावांनी मात करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
प्रत्येकी ४० षटकांच्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या जी.पी.सी.सी.-डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय संघाने ३८.३ षटकांत सर्वबाद १७३ धावा केल्या. यात अंश नाथवानी (१९), अद्वैत तिवारी १६, अंकित म्हात्रे ३९, आदित्य कांटे ३३ आणि अमेय वाडेकर २५ यांनी योगदान दिले. अमेय क्रिकेट अकादमी तर्फे हार्दिक गजमल याने २९ धावांत ३ बळी मिळविले, तर ओम प्रजापती (२/२६) आणि अर्णव गवाणकर (१८/२) यांनी प्रत्येकि दोन बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना अमेय क्रिकेट अकादमी संघाचा डाव २४.२ षटकांत केवळ ९३ धावांत गुंडाळला गेला. मोहम्मद सलमान खान याने १६ धावांत ४ बळी मिळवत प्रतिस्पर्धी फलंदाजांना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. त्याला अद्वैत तिवारी (२०/३) आणि आयुष्य चव्हाण (२४/२) यांची सुरेख साथ लाभली. अमेय क्रिकेट अकादमी संघाच्या आरव गौतम (१५), हार्दिक गजमल (२७) आणि आयुष्य वालम (१०) यांनाच दोन आकडी धावा करता आल्या.
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणू मोहम्मद सलमान खान याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अमेय क्रिकेट अकादमीच्या आशिष खेडेकर (११ बळी) याला गौरविण्यात आले, तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओंकार नाईक याची निवड करण्यात आली. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबई क्रिकेट अससोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक, मुंबई उच्च न्यायालयाचे पी.पी. दीपक ठाकरे आणि ड्रीम स्पोर्ट्स चे प्रशांत तायडे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक – जी.पी.सी.सी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय – ३८.३ षटकांत सर्वबाद १७३ (अंश नाथवानी १९, अद्वैत तिवारी १६, अंकित म्हात्रे ३९, आदित्य कांटे ३३, अमेय वाडेकर २५; हार्दिक गजमल २९/३, ओम प्रजापती २६/२, अर्णव गवाणकर १८/२) वि.वि. अमेय क्रिकेट अकादमी – २४.२ षटकांत सर्वबाद ९३ (आरव गौतम १५, हार्दिक गजमल २७, आयुष्य वालम १०; मोहम्मद सलमान खान १६/४, अद्वैत तिवारी २०/३, आयुष्य चव्हाण २४/२).
फोटो ओळी – ओव्हल मैदान, चर्चगेट येथे झालेल्या ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या जी.पी.सी.सी.- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय संघाचे छायाचित्र. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक, मुंबई उच्च न्यायालयाचे पी.पी. दीपक ठाकरे आणि ड्रीम स्पोर्ट्स चे प्रशांत तायडे आदी दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *