जर्नालिस्ट युनियनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नारायण पांचाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महेंद्र सातपुते )
तळेरे: ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता.देवगड) येथील स्मारक स्थळी जर्नालिस्ट युनियनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष नारायण पांचाळ यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील स्मारक स्थळी अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून तसेच जिल्ह्यातील पत्रकार बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. याप्रसंगी जर्नालिस्ट युनियनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांचे पाचवे वंशज सुधाकर जांभेकर यांच्या घरी जेयुएम् युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी भेट देऊन बाळशास्त्री जांभेकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा तसेच त्यांच्या नावाने कोकणात पत्रकारिता विद्यापीठ सुरू करण्याच्या मागणीचा पाठपुरावा जर्नालिस्ट युनियनच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती या भेटी दरम्यान दिली. त्याबद्दल जांभेकर कुटुंबीयांनी कौतुक करुन समाधान व्यक्त केले. तसेच त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याचे मान्य केले. यावेळी पाचल पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने देखील बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार- उदय दुदवडकर, उपाध्यक्ष- गुरुप्रसाद सावंत, सचिव – संजय खानविलकर, सचिन राणे, निकेत पावसकर, सतिश मदभावे, गणेश चव्हाण, विवेक परब, संतोष अपराज आदी उपस्थित होते.
00000
