आज १० जानेवारी हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम गायक आणि संगीतकार येसुदास यांची ८५ वाढदिवस. हिंदी चित्रपट सृष्टीत ज्या गायकांनी आपल्या मधुर आवाजाने ठसा उमटवला त्यात येसुदास हे एक महत्वाचे नाव. १० जानेवारी १९४० रोजी एका मल्याळम ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या येसुदास यांचे वडील मल्याळम भाषेतील शास्त्रीय संगीतकार होते. त्यांच्या वडिलांकडूनच त्यांनी संगीतकलेचे प्राथमिक धडे गिरवले. वयाच्या सातव्या वर्षी कोची येथील स्थानिक स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी सुवर्णपदक जिंकले. कन्नड, मल्याळम, तेलगू आणि तामिळ या दक्षिण भारतातील सर्व भाषेत त्यांनी गाणी गायली तिथे त्यांनी गायलेली सर्वच गाणी हिट झाली. त्यांच्या आवाजाची परदेशातील रसिकांना देखील भुरळ पडली. १९६५ साली रशियन सरकारने त्यांना गाण्यासाठी खास आमंत्रण दिले होते. गोड, मखमली आवाज ही येसुदास यांची ओळख बनली. त्यांच्या गोड आणि मखमली आवाजाची कीर्ती हिंदी चित्रपट सृष्टी पर्यंत पोहचली नसती तरच नवल. संगीतकार सलील चौधरी यांनी त्यांना दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांच्या छोटीशी बात या चित्रपटात साठी एक गाणे गायला लावले. त्यांच्या आवाजाने बासू चॅटर्जी हे ही प्रभावित झाले त्यांनी त्यांना त्यांच्यव चित्रपटात गाण्याची ऑफर दिली. १९७० सालापासून त्यांनी हिंदी गाणी गायला सुरवात केली. जानेमन जानेमन तेरे दो नयन…. या गाण्यानंतर शांत सज्जन दिसणारा अमोल पालेकर यांच्यासाठी येसुदास यांचाच आवाज सूट होतो असा असे गणित बॉलिवूडने बांधले. येसुदास यांच्या मधुर आवाजामुळे अनेक संगीतकार त्यांना त्यांच्यासाठी गाण्याची गळ घालू लागले मात्र येसुदास हे गाण्याची निवड मात्र विचारपूर्वक करत. येसुदास यांनी फक्त अमोल पालेकर यांच्यासाठीच नाही तर अमिताभ बच्चन आणि जितेंद्र यांच्यासाठीही गाणी गायली. त्यांनी रवींद्र जैन, बप्पी लाहिरी, खय्याम, राजकमल, सलील चौधरी या संगीतकारांसमवेत अनेक सदाबहार हिंदी चित्रपटातील गाणी गायली. त्यांनी जवळपास ४५००० गाणी गायली आहेत. सध्याच्या पद्धतीची गाणी त्यांना आवडत नाहीत म्हणून त्यांनी बऱ्याच वर्षांपासून गाणे गायचे थांबवले आहे. येसुदास यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांना २००२ सालीं पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार दिला आहे तर केरळ सरकारने त्यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम स्वाती पुरस्कारम या पुरस्काराने गौरविले आहे. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. येसुदास यांनी काही दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांची निर्मितीही केली आहे. येसुदास यांनी गायलेली गोरी तेरा गाव बडा प्यारा, सुरमई अखियों मे, दिल के तुकडे तुकडे करके, जानेमन जानेमन तेरे दो नयन, चांद जैसे मुखडे पे ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. येसुदास यांचे चाहते केवळ भारतातच आहेत असे नव्हे जगभर त्यांचे चाहते आहेत. गोड आणि मखमली आवाजाचे गायक येसुदास यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *