कल्याण : एनएमएमटी च्या बसला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (दि.९) घडली. सकाळच्या सुमारास घणसोली येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बसला आग लागली. आगीची माहिती मिळताच तातडीने वाहतूक पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना प्रचारण करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील दहा प्रवाशांचा जीव वाचला आहे.
घणसोली येथून कल्याणच्या दिशेने बस निघाली होती. कल्याण शिळं रस्त्यावरील घारीवली बस स्टॉप जवळ बस मधून धूर येऊ लागला. याची माहिती चालकाला मिळताच त्याने बस एका बाजूला घेऊन प्रवाशांना सुरक्षितरित्या बस बाहेर काढले. त्यानंतर बसला लागलेल्या आगीचा मोठा भडका उडाला. तातडीने केडीएमसीच्या पलावा केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. बस आगीत जळून खाक झाली.
बसला आग लागल्याची घटना घडल्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आग लागलेल्या परिसरातील स्थानिकांनी घरच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये मोटार सुरू करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना वेळेत घटनास्थळी पोहचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *