मुंबई : केंद्रीय मंडळाची बारावी परीक्षा तसेच काही अडचणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या सूचना आल्यानंतर सीईटी सेलने अगोदर जाहीर केलेल्पा परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. तंत्रशिक्षणविभागाच्या अंतर्गत येत असलेल्या २ आणि उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या ३ अशा पाच अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखेत बदल केला आहे.
येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान बारावी सीबीएसई परीक्षा मधील इतिहास, भाषा विषय आणि होम सायन्स आणि मानसशास्त्र या विषयांचे सलग चार दिवस पेपर असणार आहेत. यामुळे ४ एप्रिल रोजी मानसशास्त्र पेपर असल्याने त्यामुळे सीईटी सेलकडून १ ते ४ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत होती याची दखल घेत या कालावधीत येत असलेल्या ४ एप्रिल रोजी होणारी पाच वर्ष विधी या अभ्यासक्रमाची प्रवेश पूर्व परीक्षा आता नव्या तारखेनुसार २८ एप्रिल रोजी होणार आहे. बीएड आणि एमपीईड या दोन सीईटी १६ मार्च रोजी होणार होत्या आता या तारखेत बदल केला असून १९ मार्च रोजी होणार आहे. एमपीएडची फिल्ड चाचणीच्या परीक्षा तारखेतही बदल केला असून पुर्वी ही परीक्षा १७ ते १८ मार्च या कालावधीत होणार होती आता २० आणि २१ मार्च रोजी होणार आहे. तर तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येत असलेल्या एमबीए / एमएमएस परीक्षा १७ ते १९ मार्च या कालावधीत पूर्वी होणार होती आता ही परीक्षा १ ते ३ एप्रिल या कालावधीत होणार आहे. तर बीबीए/बीसीए/बीबीएम ही सीईटी परीक्षा पूर्वी १ ते ३ एप्रिल या कालावधीत होणार होती आता २९ ते ३० एप्रिल अणि २ मे रोजी होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना पुढील वर्षी प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आतापासूनच परीक्षांची तयारी करता यावी यासाठी सीईटी सेलकडून नोव्हेंबरमध्येच १९ अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) चे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षेला बसण्यासाठी अर्ज नोंदणीही सुरु झाली आहे.