जस्टिन ट्रुडो नेता होण्यापूर्वी व्हँकुव्हरमध्ये शिक्षक होते. त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले. ‘द ग्रेट वॉर’ हा त्यांचा लक्षात राहिलेला चित्रपट. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी कॅनडाच्या संसदेत लिबरल पक्षाचे सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला. २०११ मध्ये निवडणुका झाल्या. त्यात लिबरल पक्षाने ३४ जागा जिंकल्या. २०१३ मध्ये लिबरल पक्षाची कमान ट्रुडो यांच्याकडे सोपवण्यात आली होती. २०१५ मध्ये कॅनडात ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या. लिबरल पक्षाने १८४ जागा जिंकून बहुमताने सरकार स्थापन केले. मतदान पद्धतीत बदल आणि खर्चात कपात करण्याचे आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. ही दोन आश्वासनेही पूर्ण होतील या आशेने मतदारांनी २०१९ आणि २०२१ मध्येही ट्रुडो यांच्यावर विश्वास व्यक्त केला; मात्र त्यांना पहिल्यांदा बहुमताचा आकडा गाठता आला नाही. जस्टिन ट्रुडो हे कॅनडाचे नेते आणि १५ वर्षे पंतप्रधान राहिलेले पीटर ट्रुडो यांचे पुत्र आहेत. पीटर्स ट्रुडो हे त्यांच्या करिष्माई आणि प्रभावशाली नेतृत्व शैलीसाठी ओळखले जात होते. १९६८ ते १९७९ आणि पुन्हा १९८० ते १९८४ पर्यंत ते सत्तेत होते; मात्र आजारपणामुळे त्यांनी १९८४ मध्ये पंतप्रधानपद सोडले. गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, की ते पदभार स्वीकारताच कॅनडामधून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सर्व उत्पादनांवर २५ टक्के शुल्क आकारण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करतील. यानंतर कॅनडाच्या उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर ट्रुडोच्या २० खासदारांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची मागणी करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी केली. ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड ही ट्रुडोसाठी मोठी आपत्ती ठरली. ट्रम्प यांचे मित्र एलॉन मस्क यांनी तर कॅनडात ट्रुडो यांचा पराभव घडवून आणण्याची भाषा केली होती. ट्रुडो जेव्हा ट्रम्प यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेले, तेव्हा ट्रम्प यांनी त्यांना ‘गव्हर्नर ट्रुडो’ असे संबोधून त्यांची खिल्ली उडवली. इतकेच नाही तर त्या वेळी ट्रम्प यांनी कॅनडाला ५१ वे राज्य असेही म्हटले होते.
कॅनडातील ताज्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की हुजूर पक्ष हा सध्याच्या सत्ताधारी पक्ष लिबरल्सपेक्षा २६ टक्क्यांनी आघाडीवर आहे. हुजूर पक्षासाठी हा सर्वात मोठा फायदा मानला जात आहे. ‘३३८कॅनडा डॉट. कॉम’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, आता निवडणुका घेतल्यास हुजूर पक्षाला प्रचंड बहुमत म्हणजेच २३६ जागा मिळू शकतात, तर ट्रुडो यांचा पक्ष जेमतेम ३० ते ३५ जागा मिळवू शकतो. भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध गेल्या काही काळापासून बिघडले आहेत. कॅनडात खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी ट्रुडो यांनी आरोप केला होता, की या हत्येत भारतीय दलालांचा सहभाग असल्याचा पुरावा आहे. भारताने हा आरोप फेटाळला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडत गेले. दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले होते. सध्या दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहेत. ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले, तेव्हा कॅनडातील शीख समुदायाची मते मिळवण्यासाठी ट्रुडो भारताप्रती इतकी आक्रमकता दाखवत असल्याची चर्चा होती. भारत सरकार कॅनडाला खलिस्तानी फुटीरतावाद्यांवर कारवाई करण्यास सांगत आहे. व्होट बँकेचे राजकारण लक्षात घेऊन ट्रुडो सरकार खलिस्तानबाबत मवाळ असल्याचे भारताचे मत आहे. कॅनडाच्या लोकसंख्येच्या २.१ टक्के शीख आहेत. कॅनडातील शीख लोकसंख्या गेल्या २० वर्षांत दुप्पट झाली आहे. त्यापैकी बहुतेक लोक पंजाबमधून शिक्षण, करिअर, नोकरी इत्यादी कारणांसाठी तेथे गेले आहेत. कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या लोकांच्या मतदारांची संख्या मोठी आहे. ती कॅनडाच्या लोकसंख्येच्या चार टक्के आहे. यापैकी निम्म्याहून अधिक शीख आहेत. अल्पसंख्याक विरोधी नेते जगमीत सिंग यांचा त्यात समावेश आहे. त्यांचा ‘न्यू डेमोक्रॅटिक पक्ष’ ट्रुडो यांना सत्तेत ठेवत आहे; मात्र गेल्या वर्षी जगमीत सिंग यांनी ट्रुडो यांचा पाठिंबा काढून घेतला. भारताशी संबंध बिघडले, तर त्याचा परिणाम कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवरही होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता; परंतु मतांच्या राजकारणासाठी ट्रुडो यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि देशाला आर्थिक खाईत ढकलले. कॅनडामध्ये शिकणाऱ्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी ४० टक्के विद्यार्थी हे भारतातील आहेत. भारत हा कॅनडाच्या टॉप १० व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. ट्रुडो यांच्या भारताबाबतच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांनी असेही म्हटले, की पोलिस तपास पूर्ण होण्यापूर्वीच ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले. अमेरिकन नागरिक आणि शीख फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येच्या अयशस्वी कटातही अमेरिकेने भारतावर आरोप केले होते, तरीही या प्रकरणात सर्वोच्च अमेरिकन नेत्याऐवजी केवळ अमेरिकन अधिकारीच वक्तव्ये करताना दिसत होते. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सामान्य राहिले.
जगमीत सिंग यांच्या ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’ (एनडीपी) पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केल्यावर ट्रुडो यांच्या अल्पमतातील सरकारला आणखी एक धक्का बसला. ‘एनडीपी’ने गेल्या अडीच वर्षांपासून ट्रुडो सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामु‍ळेच ट्रुडो सत्तेत राहिले. जगमीत सिंग यांच्या भारतीय वंशाच्या पक्षाने गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत २४ जागा जिंकल्या होत्या आणि ते ‘किंगमेकर’च्या भूमिकेत होते. कॅनडाच्या भारतासोबतच्या संबंधांमध्ये तणाव असतानाच ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले. जस्टिन ट्रुडो यांचा कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा अपरिहार्य होता. ट्रुडो यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. ट्रुडोचे सरकार हे बुडणारे जहाज होते. ट्रुडो यांचे सरकार पडणे आणि त्यांचा राजीनामा त्यांच्या अनेक चुकीच्या निर्णयांमुळे आहे. अनेक संधीसाधू सत्ता बळकावण्याच्या धोरणांमुळे हे घडले आहे. ट्रुडो यांनी अनेक चुका केल्या. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम झाला. त्यांनी आपल्या सत्तेच्या लालसेपोटी आणि संधीसाधूपणामुळे भारत आणि कॅनडाचे महत्त्वाचे संबंध पणाला लावले आणि आपले अल्पसंख्याक सरकार वाचवण्यासाठी त्यांनी खलिस्तान समर्थक दहशतवादी आणि अतिरेकी घटकांशी हातमिळवणी केली. जगमीत सिंग आणि ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’च्या सांगण्यावरून त्यांनी भारतविरोधी भूमिका घेतली. देशांतर्गत पातळीवरही त्यांना लिबरल पक्षाच्या अनेक खासदारांकडून टीकेला सामोरे जावे लागत होते. ट्रुडो यांच्या विरोधात त्यांच्याच लिबरल पक्षात बंडखोरी झाली होती.
अलीकडच्या काळात, त्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांनी सरकारमधून राजीनामे देण्यास सुरुवात केली होती. ज्यात फ्रीलँड, लिबरल पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचाही समावेश होता. त्यांच्या पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी ज्या प्रकारे एकामागून एक राजीनामे देण्यास सुरुवात केली, त्यावरून ट्रुडो यांचे सरकार सतत कमकुवत होत असल्याचे दिसून येत होते. ट्रम्प यांनी ज्या प्रकारे कॅनडाला त्यांचे ५० पहिले राज्य म्हणून सांगण्यास सुरुवात केली, त्यामुळे ट्रुडो यांच्या सरकारसाठी खूप डोकेदुखी निर्माण झाली होती. शेजारील राष्ट्र आपल्या देशाचे कसे लचके तोडू शकते, अशी चर्चा सुरू झाली. त्याचे खापरही ट्रुडो यांच्यावर फोडले जात होते. ट्रुडो यांचे ट्रम्प यांच्याशी तणावपूर्ण संबंध होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळत होती. अशा स्थितीत ट्रुडो सरकार राहिले असते, तरी भविष्यात अमेरिका-कॅनडा तसेच भारत आणि कॅनडा संबंधात मोठी प्रगती होण्याची शक्यता नव्हती. ट्रुडो केवळ त्यांच्या देशांतर्गत धोरणांमुळेच नव्हे, तर त्यांच्या स्वार्थीपणामुळे, संधीसाधूपणामुळे आणि परकीय स्तरावर त्यांच्या मोठ्या चुकांमुळे त्यांनी भारत आणि अमेरिकेसारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांसोबतचे त्यांचे संबंध बिघडवले होते. ते सर्व बाजूंनी वेढले गेले आणि जेव्हा ते अंतर्गतदृष्ट्या कमकुवत होऊ लागले तेव्हा त्यांच्या पक्षातही त्यांच्याविरुद्ध बंडखोरीची परिस्थिती निर्माण झाली.

पंतप्रधानपदाचा राजीनामा देताना ट्रुडो यांनी अतिशय भावूक भाषण केले. यामध्ये त्यांनी स्वत:ला ‘फायटर’ म्हटले; पण ट्रुडो यांना आता त्यांचे भविष्य सुधारायचे असेल, तर राजकारणी म्हणून त्यांच्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. येणाऱ्या काळात जर त्यांनी त्यांची दृष्टी, त्यांचा राष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन, राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारला नाही आणि त्यांच्या चुकांमधून धडा घेतला नाही, तर त्यांचे राजकीय भवितव्य चांगले नाही. त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा लिबरल पक्ष आता नव्या नेत्याची निवड करणार आहे. पक्षाच्या अनेक खासदारांना वाटले, की कॅनडात फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होतील. त्या लढवण्याच्या स्थितीत त्यांचा पक्ष नव्हता. त्यामुळे अंतर्गत बंडाळीची परिस्थिती इतकी टोकाला गेली होती, की त्यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नाही. म्हणजेच, ट्रुडो सरकारच्या आत जे काही घडामोडी घडत आहेत, त्या त्यांच्या स्वत: च्या मोठ्या चुका आहेत. याचाच परिणाम म्हणजे ट्रुडो केवळ पंतप्रधानपदावरून पायउतार झाले नाहीत, तर त्यांच्या पक्षाच्या नेत्याच्या पदावरूनही पायउतार झाले आहेत. आता ट्रुडो यांच्यानंतर जो कोणी लिबरल पक्षाचा नवा नेता असेल किंवा निवडणुकीनंतर कोणताही पक्ष सत्तेवर येईल, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि कॅनडाचे संबंध सुधारतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. एखाद्या राष्ट्राच्या नेत्याने राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कट्टरपंथी आणि अतिरेकी दहशतवाद्यांशी हातमिळवणी केली, तर त्याचा काय परिणाम होतो, हे ट्रुडो यांच्या अनुभवावरून जगाने शिकायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *