अशोक गायकवाड
रायगड : शहीद वीर यशंवतराव घाडगे यांचा गौरवशाली इतिहास आजच्या भावी पिढीपर्यंत पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे केले.
माणगाव येथे शहीद वीर यशंवतराव घाडगे व्हिक्टोरीया क्रॉस मानचिन्ह धारक (मरणोत्तर) यांचा जयंती समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी घाडगे उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माणगाव प्रांताधिकारी डॉ.संदीपान सानप, प्रमुख अतिथी म्हणून कर्नल किशोरकुमार मोरे होते. तर उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी,घाडगे उत्सव समितीचे सचिव तथा तहसिलदार दशरथ काळे,वीर यशवंतराव यांचे वारसदार सुभाष घाडगे,माणगाव नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी, माणगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील,गटशिक्षणाधिकारी सुरेख तांबट, केंद्रप्रमुख शंकर शिंदे,माजी सैनिक संघटना माणगाव अध्यक्ष सहादेव खैरे,माजी अध्यक्ष विष्णू सावंत,पोलादपूर माजी सैनिक संघटना अध्यक्ष वाय.सी.जाधव,माणगाव नगरपंचायत महिला व बालकल्याण समिती सभापती सुविधा खैरे आदींसह आजी-माजी सैनिक,पोलीस अधिकारी-कर्मचारी, विविध शाळांचे शिक्षकवर्ग,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्हिक्टोरिया क्रॉस विजेते शहीद वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केले. त्या पुढे म्हणाल्या की, माजी सैनिक यांच्या विश्रामगृहासाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धतता करुन दिली जाईल. विश्रामगृहामध्ये वीर मरण आलेल्या सैनिकांची माहिती दिल्यास ती माहिती भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल असे त्यांनी यावेळी सांगितले. वीर घाडगे यांच्या वीर शौर्याची गाथा वर्तमान पिढीतील लोकांपेक्षा भावी पिढीपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी पुढील वर्षी होणार वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंती समारंभास माणगाव शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी तसेच तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना बोलविल्यास ही शौर्याची गाथा भावी पिढीपर्यंत पोहचून हा समारंभ अधिक मोठ्या प्रमाणात आपल्याला साजरा करता येईल असेही त्या म्हणाल्या.
यावेळी पोलादपूर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कर्नल किशोर कुमार मोरे, वाय.सी.जाधव, माजी सैनिक संघटना माणगाव अध्यक्ष सहादेव खैरे यांनी आपल्या मार्गदर्शनात शहीद वीर यशवंतराव घाडगे यांच्या अतुलनीय शौर्याची माहिती दिली. या समारंभाच्या प्रास्ताविकात घाडगे उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माणगाव प्रांताधिकारी डॉ.संदीपान सानप म्हणाले की, वीर यशवंतराव घाडगे यांची स्मृती कायम रहावी म्हणून रायगड जिल्ह्यातील माणगाव उपविभागीय कार्यालयाजवळ त्यांचा कायमचा पुतळा उभारण्यात आला आहे. वीर यशवंराव घाडगे यांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीची स्मृती सतत जिवंत रहावी म्हणून माणगाव तहसिल कार्यालयामार्फत दरवर्षी 9जानेवारी रोजी त्यांचे कुटूंबिय, लोकप्रतिनीधी, प्रतिष्ठीत नागरीक व शाळा/कॉजेजमधील विद्यार्थी तसेच माणगाव, महाड, पोलादपूर, रोहा, म्हसळा, तळा या तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या उपस्थितीत मोठया प्रमाणात घाडगे उत्सव साजरा करण्यात येतो. या समारंभाला उपस्थित सर्वांचे आभार घाडगे उत्सव समितीचे सचिव तथा तहसीलदार माणगाव दशरथ काळे यांनी मानले.
0000