भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची मागणी

 

ठाणे : महापालिकेचा दहा लाखांहून अधिक मालमत्ता कर थकविणाऱ्या आस्थापनांच्या दरवाजाबरोबरच ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणीही ढोल-ताशे व बॅण्ड वाजवावेत, अशी मागणी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना अनधिकृत बांधकामांची माहिती होण्याबरोबर माफियांनाही काहीसा आळा बसू शकेल, असे  वाघुले यांनी पत्रात म्हटले आहे.
मालमत्ता थकबाकीदार बिगरनिवासी आस्थापनांच्या मालमत्तांच्या दरवाजात ढोल-ताशांसह बॅण्ड वाजविण्याचा स्तुत्य निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. एकीकडे मालमत्ता कराच्या थकबाकीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले असताना, ठाणे शहरात सुरू असलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. एक सात मजली अधिकृत इमारत बांधल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीत सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. मात्र, सद्यस्थितीत दुर्देवाने शेकडो अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याकडे  वाघुले यांनी लक्ष वेधले.
अनधिकृत बांधकामांना बेकायदा नळजोडणी दिली जात असून, महापालिकेच्या अधिकृत वाहिन्यांना सांडपाणी व मलवाहिन्या जोडल्या जात आहेत. या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, चारचाकी वाहने रस्त्यालगत उभी करून वाहतूककोंडीत भर पडत आहे. ठाणे शहराच्या बकालपणात वाढ होत आहे. अशा भीषण परिस्थितीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्या माफियांना जरब बसविण्याची आवश्यकता आहे, असे  वाघुले यांनी पत्रात म्हटले आहे.
महापालिकेच्या बारा प्रभाग समितीतील अतिक्रमण व निष्कासन उपायुक्तपदाबरोबरच परिमंडळ २ चा कार्यभार  शंकर पाटोळे यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी ढोल ताशांसह बॅण्ड वाजविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी  वाघुले यांनी केली आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *