सागरी व्यापार हिताचे रक्षण करण्यासाठी भारतातील नाविक वचनबद्ध – मिलिंद कांदळगावकर
अनिल ठाणेकर
ठाणे : सागरी मार्गातील भारताचे नेतृत्व केवळ देशाच्या सागरी क्षेत्राला बळकट करत नाही तर जागतिक स्तरावर अशा प्रकारचे प्रयत्न करण्यासाठी एक मॉडेल म्हणून काम करेल. या सहयोगी प्रयत्नातून जागतिक सागरी व्यापार चालू ठेवणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारतातील नाविक वचनबद्ध आहेत, असे नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली.
भारतातील सागरी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी एक व्यापक उपक्रम सुरू करण्यासाठी जहाज बांधणी महासंचालनालय (DGS) व आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार महासंघ ( ITF) यांच्यामध्ये ७ जानेवारी २०२५ रोजी मुंबईत ऐतिहासिक समझोता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या समझोता करार प्रसंगी मेरीटाईम युनियन ऑफ इंडिया ( MUI ), नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया ( NUSI), फॉरवर्ड सिफेरर्स युनियन ऑफ इंडिया ( FSUI ) या जहाज उद्योगातील युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते.भारतातील सागरी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. डीजी शिपिंगचे महासंचालक श्याम जगन्नाथन आणि आयटीएफचे ग्लोबल इन्स्पेक्टोरेट समन्वयक श्री. स्टीव्ह ट्रॉसडेल यांच्या भागीदारीतून सागरी प्रशिक्षण संस्थांमध्ये विशेष प्रशिक्षित प्रशिक्षकांचे जाळे स्थापन केले जाईल. त्यामुळे सागरी प्रशिक्षणार्थी आणि सागरी व्यवसायिकांना प्रगत कल्याणासाठी विविध कार्यक्रम दिले जातील. जागतिक सर्वोत्तम पद्धतीचा अवलंब करून आणि नाविन्य पूर्ण तेला चालना देऊन खलाशांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण यास प्राधान्य दिले जाईल. हा उपक्रम सागरी उद्योगाच्या भविष्यासाठी आवश्यक आहे, असे श्री जगन्नाथन यांनी स्वाक्षरी करताना सांगितले. नूसीचे सरचिटणीस व खजिनदार श्री. मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले की खलाशी कामगारांच्या प्रश्नांची ITF चे श्री. स्टीव्ह ट्रॉसडेल यांनी दखल घेऊन आपले वचन पूर्ण केले. आय.टी. एफ. चे ग्लोबल वॉर्मिंगचे कोऑर्डीनेटर डॉ. सय्यद असीफ अल्लाफ यांनी सांगितले की अनेक वर्ष नियोजन करून आपण प्रशिक्षणाचे काम करीत होतो परंतु आता या करारामुळे खलाशी कामगारांना अनेक महत्त्वपूर्ण फायदे मिळणार आहेत. नाविक कामगारांच्या कल्याण उपक्रमासाठी MUI, NUSI, FSUI यांच्या पुढाकाराने आणि DGS व ITF भागीदारीमुळे एक नवीन चांगला पायंडा पडला आहे. हा उपक्रम सर्व सागरी संस्थांमध्ये राबविला जात असल्याने समुद्र मार्गाच्या गरजा पूर्ण होऊन चांगला आरोग्यदायी कर्मचारी वर्ग तयार होईल, असेही मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.
000