ठाणे : सर्वधर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा जगावर अद्भूत प्रभाव पडला. जगावर आजही स्वामीजींच्या विचारांचे गारुड कायम आहे. आजचा आधुनिक भारत हा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी बांधलेला आहे, असे प्रतिपादन विवेकानंद केंद्रांचे प्रांत प्रमुख अभय बापट यांनी विचारमंथन व्याख्यानमालेचे १४वे पुष्प गुंफताना केले.
ठाणे महापालिकेच्या वतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीने, ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते, त्यांचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जाते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘स्वामी विवेकानंद -जीवन आणि संदेश’ या विषयावरील अभय बापट व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी अभय बापट यांचे स्वागत केले. त्याप्रसंगी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी उपस्थित होते. अभय बापट यांनी स्वामीजींचा चरित्रपट वेगवेगळ्या प्रसंगातून उलगडून दाखवला. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याचा अभ्यास करणारी व्यक्ती कधीही निष्क्रिय राहू शकणार नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. जो दुसऱ्यांसाठी जगतो, तोच माणूस ही सेवाभावी वृत्ती आपण अंगीकारली पाहिजे. समाजाचे आपण देणे लागतो, त्यामुळे आपले नियत काम प्रामाणिकपणे करणे हेही विवेकानंद यांना अभिप्रेत होते, असेही बापट म्हणाले.आपल्यात भिन्नता काय आहे याचा विचार न करता, आपल्यात समान धागा काय आहे, ते पाहून काम करायला हवे. आपल्यात भारतभूमी हा समान धागा आहे, असा मंत्र त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच दिला होता. त्यांच्या विचारांचा प्रभाव स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या विविध नेतेमंडळींवर पडलेला दिसतो. लोकमान्य टिळक यांनी त्यांचा आधुनिक शंकराचार्य असा उल्लेख केल्याचे स्मरणही बापट यांनी करून दिले. देशात जे काही सकारात्मक काम सुरू आहे त्यामागे स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा असल्याचे आपल्याला निश्चितपणे जाणवेल. रोजच्या जीवनात समाधान आणि सार्थकता हवी असेल तर स्वामी विवेकानंद यांचे स्मरण आणि त्यांच्या विचारांनुसार आचरण करणे महत्त्वाचे आहे, असेही बापट यांनी स्पष्ट केले. विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचाही त्यांनी यावेळी थोडक्यात आढावा घेतला. महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ठाणेकर नागरिकही या व्याख्यानास उपस्थित होते. राजेंद्र पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *