अनिल ठाणेकर
पालघर : गेल्या आठवड्यात, पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे सीपीआय(एम) ने महाविकास आघाडीमधील आणि बाहेरील मित्रपक्षांच्या ३०० हून अधिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. डहाणू विधानसभा जागेवर सीपीआय(एम) चे उमेदवार विनोद निकोले यांचा विजय सुनिश्चित करण्यात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला.
या विजयात यंदा सीपीआय(एम) ला १,०४,००० पेक्षा जास्त मते मिळाली, जी २०१९ मध्ये मिळालेल्या विजयापेक्षा ३२,००० मतांनी जास्त होती. डहाणूतील विजयाने महाराष्ट्रात आलेल्या भाजप-महायुतीच्या त्सुनामीला आव्हान दिले गेले. यात लक्षणीय बाब म्हणजे, १९७८ पासून झालेल्या गेल्या ११ राज्य विधानसभा निवडणुकांपैकी १० निवडणुकीत सीपीआय(एम) ने डहाणू (अज) जागा (जी २००९ मध्ये सीमांकनापूर्वी जव्हार-अज जागा होती) जिंकली आणि ती देखील पाच वेगवेगळे उमेदवार देऊन. दिनांक ७ जानेवारी रोजी झालेल्या या मेळाव्याच्या दिवशीच महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या (एआयकेएस) स्थापनेचा ८०वा वर्धापन दिन होता. कॉम्रेड शामराव आणि गोदावरी परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली १९४५ साली ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथे हे स्थापना अधिवेशन झाले होते, आणि त्यानंतर लगेच मे १९४५ मध्ये ऐतिहासिक व विजयी आदिवासी उठावाची सुरुवात तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या तलासरी-डहाणू भागात झाली होती. या मेळाव्याला संबोधित करणाऱ्यांमध्ये सीपीआय(एम) पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि पुनर्निर्वाचित आमदार विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि जिल्हा सचिव किरण गहला, राष्ट्रवादी-शरद पवार यांचे नेते काशीनाथ चौधरी, कीर्ती मेहता आणि मिहिर शाह, शिवसेना-उद्धव ठाकरे यांचे नेते अजय ठाकूर, काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पाटील, कष्टकरी संघटनेचे नेते ब्रायन लोबो आणि बहुजन विकास आघाडीचे नेते अरुण निकोले यांचा समावेश होता. सर्व वक्त्यांनी भाजप आणि महायुतीवर सडकून टीका केली आणि लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीला बळकट आणि व्यापक करण्याचे आणि दीर्घकाळापासून रखडलेल्या ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचे आणि जिंकण्याचे बुलंद आवाहन केले.
