अनिल ठाणेकर
ठाणे : विद्यार्थ्यांना कला सादर करताना पाहून आनंद होतो त्यामुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणे आणि प्रोत्साहन देण्यासाठी आजचा हा मंच प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचे आत्मसन्मान उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नाट्य, गीत, समुह गीतं, समुह नृत्य अशा विविध कलागुणांना उंचावर घेऊन जाण्यासाठी विशेष शिक्षकांनी मोलाची भुमिका बजावली आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित सर्वांना शुभेच्छा मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा २०२४-२५, एन. के. टी. सभागृहात १० जानेवारीला पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा परिषद शाळा शेलवली बांगर येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली. जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत सेस फंडातून जिल्हा स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून सांस्कृतिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आपण दरवर्षी आयोजित करतोय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मंच देण्यासाठी आणि विविध गुण सादर करण्यासाठी ही स्पर्धा मोलाची आहे असे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी प्रास्ताविक करताना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक विभागातील कार्यक्रम उत्तमरित्या सादर केले जात आहेत. यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत मोलाचे आहे. सर्व विद्यार्थ्यांना सदिच्छा शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले यांनी दिल्या. डोंबारी समाजातील बांधवांनी आपल्या कलागुणांना सादर करीत उदरनिर्वाह केला आहे. त्यांना येणाऱ्या विविध समस्या समाजासमोर मांडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांची जाणीव नृत्याच्या माध्यमातून करून देण्यासाठी “नाचतो डोंबारी” या गाण्यावर सादरीकरण करताना “नाचतो डोंबारी, आम्ही कसरत करतो जगण्यासाठी, वाजले का ती घंटा शाळेची माझ्यासाठी” असा संदेश विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करताना दिला ही आनंदाची बाब आहे असे मत व्यक्त जिल्हा परिषद शाळा बौद्ध पाडा, केंद्र खातीवली येथील मुख्याध्यापक संतोष जाधव यांनी व्यक्त केले. तालुका स्तरावरील विजेता विद्यार्थ्यांनी आज जिल्हा स्तरावर सादरीकरण करण्यासाठी उत्साही वातावरणात सहभाग नोंदविला. लोकनृत्य – इ. 2 री ते 8 वी गट, समूहगान (लहान गट) – इ. 1 ली ते 5 वी, समूहगान (मोठा गट) – इ. 6 वी ते 8 वी, वक्तृत्व (लहान गट) – इ. 1 ली ते 5 वी, वक्तृत्व (मोठा गट) – इ. 6 वी ते 8 वी, नाट्य – इ. 1 ली ते 8 वी गट सादरीकरण प्रत्येक तालुक्यातील पाच लोककला व लोकनृत्य विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या सादरीकरण केले. यावेळी एन. के. टी शाळा संस्थापक नानजीभाई ठक्कर, उपशिक्षणाधिकारी अरूण शिंदे, विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव, विस्तार अधिकारी शिक्षण देवदत्त शिंदे, एन. के. टी. हायस्कूलचे मुख्याध्यापक लिडीया सैलियन, जिल्हा  समन्वयक अनिल कुऱ्हाडे, जिल्हा समन्वयक भरत वेखंडे, परीक्षक, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व सहायक शिक्षक यातील तज्ञ परीक्षक उपस्थित होते  तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. सुत्रसंचलन रवींद्र तरे यांनी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे मोलाचे काम केले  आहे. या कार्यक्रमास सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी नास्ता, चहा व दुपारच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, तसेच विद्यार्थ्यांना जाण्यायेण्यासाठी वाहतूक भत्याची रक्कम या पूर्वीच पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आली असून कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग लाभला तसेच कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्था याबाबत उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *