महाविकास आघाडीच्या नव्या सरकारची स्थापना सरत्या वर्षी 5 डिसेंबरला झाली. सरकारचा शपथविधी झाला आणि 17 डिसेंबरला सरकारमध्ये मंत्री मंडळातील सर्व 42 जागा एकाच फटक्यात भरल्या गेल्या. त्या मंत्र्यांना खाते वाटप व्हायला 22 डिसेंबर उजाडला. त्या नंतरचे सात आठ दिवस आमदारा मंत्र्यांसाठी खाजगी सुटीचे दिवस होते. मंत्री आपापल्या गावात सत्कार घेऊन 31 डिसेंबर साजरा करून परतले आणि मग मंत्रालयात दाखल झाले. तोवर मुंबईत मंत्र्यांना राहण्याचे बंगले आणि मंत्रालयातील दालने यांची निश्चितीही केली गेली. पण त्यावरून अर्थातच कुरबुरीही होत्या. आधी मंत्री होणार की नाही याची चिंता, नंतर खाते कोणते मिळणार याची काळजी, बंगला व दालनाचेही टेन्शन असे दोन तीन आठवडे पार पडले आहेत आणि नव्या वर्षात सारे मंत्रीही मंत्रालयात दिसू लागले आहेत.
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे सरकार नागपूर अधिवेशना नंतर आता जोमाने कामाला लागले आहे. नव्या वर्षात त्यांनी मंत्रीमंडळाच्या दोन बैठका तर घेतल्याच पण त्या शिवाय प्रत्येक मंत्रालयीन विभागांचा पूर्ण आढावा घेतला. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात पुढच्या शंभर दिवसात नेमके काय काम केले जाणार याची माहिती द्यावी, असे आदेश त्यांनी शपथ घेतल्या नंतर मुंबईत विधानभवनात जी सर्व सचिवांची पहिली बैठक घेतली होती, त्यातच, म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहातच, दिले होते. ती माहिती आता येते आहे.
सह्याद्री शासकीय अतिथीगृहात मुख्यमंत्री दररोज काही विभागांचे पुढच्या शंभर दिवसांतली काय उपक्रम कार्यक्रम असतील कोणते प्रकल्प पूर्ण होतील कोणत्या योजनांचे लाभ लोकांना मिळायला सुरुवात होईल याची निश्चिती करत आहेत.
सह्याद्रीवर होणाऱ्या मंत्रालयीन विभागांच्या बैठकांमध्ये मंत्री व राज्यमंत्री दिसत आहेत. अनेकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मुख्यमंत्र्यांच्या डाव्या बाजूच्या खुर्चीत बसलेले दिसतात. पण शासनाकडून दररोज येणाऱ्या बैठकांच्या फोटोंमध्ये दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अभावानेच दिसतात. कारण नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर ते थेट परदेशात सुटीसाठी गेले होते. त्यांचा हा दरवर्षीचाचा प्रघात आहे. पवार कुटुंबीय हे नव्या वर्षाचे स्वागत परदेशातील सुटीच्या ठिकाणी करत असतात. खरेतर मातोश्रीवरील ठाकरेंचेही तसेच असते. पण यंदा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे यांचा मुक्काम मुंबईतच राहिला होता आणि ते पक्षाच्या विविध स्तरांवरच्या बैठका घेत होते.
अजितदादा आता सुटी एंजॉय करून ताजेतवाने होऊन परतले आहेत. जानेवारीच्या मध्यावर फडणवीस हे तीन दिवसांसाठी डावोसच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय महापरिषदेत सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडाल जातील. पण अर्थातच ती त्यांची सुटी नसेल तर महाराष्ट्रात नव्याने परकीय गुंतंवणुक आकर्षित करण्यासाठीचा दौरा असेल. मुख्यमंत्रीपदी पुन्हा परत आल्यानंतरचा फडणवीस यांचा हा पहिला परदेशी दौरा ठरेल.
नव्या वर्षाच्या सुरवातीला उपमुख्यमंत्री पवार हे परदेशातून परतल्यानंतर त्यांच्या पुढे प्रश्नांचे मोठे भरगच्च ताटच वाढून ठेवले होते. नागपूरच्या अधिवेशनातच त्यांचे ज्येष्ठ सहकारी धनंजय मुंडे यांच्या विरोधात ओरडा सुरु झाला होता. मुंडे हे राष्ट्रवादीत पवारांच्या नंतरचे तिसरे ज्येष्ठ मंत्री आहेत. दादा व हसन मुश्रीफ यांच्या नंतर धनंजय मुंडेंचा नंबर लागतो. मागे ते समाजकल्याण मंत्री होते. आता ते अन्न व नागरी पुरवठा हे खाते सांभाळतील. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे मुंडेंकडे गेली साडेचार वर्षे होते. त्या कालावधीत तिथे त्यांच्यावतीने वाल्मीक कराड यांची राजवट सुरु होती, हा पहिला आरोप हिवाळी अधिवेशनात विधानसभेत झाला होता. भाजपाचे बीडमधील आष्टीचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे माजलगावचे प्रकाश सोळंखे आणि केजच्या भाजपाच्या नमिता मुंदडा हे तीन्ही आमदार सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या भीषण प्रकाराने संतापले होते व त्यांचा सारा सभागृहात बाहेर पडला होता. मस्साजोग हत्येत मुंडेंच्या राष्ट्रवादीचे तालुका पदाधिकारी व स्थानिक नेते हे गुंतल्याचे स्पष्ट होताच राज्यभरात सरपंच हत्येचे तीव्र पडसाद उमटू लागले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणात उडी घेतली. अजितदादा पवार, सुनिल तटकरे यांच्या विरोधात आर्थिक घोटाळ्याचे आरोप पूर्वी दमानिया यांनी केलेच आहेत. त्यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचे अनेक नेते आहेत मुंडेंच्या निमित्ताने त्यांनी राष्ट्रवादीवरही राजकीय हल्ले सुरु केले. हिवाली अधिवेशनानंतर हा विषय वाढतच राहिला आहे.
नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपल्या नंतर राज्यभरात मोर्चे निदर्शने सुरु झाली. बघता बघता केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच देशमुख मारले गेले, हा मोठा राजकीय मुद्दा बनला. प्रत्येक मोर्चात प्रत्येक आंदोलनात विरोधी पक्षाच्या जीतेंद्र आव्हाड यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या आधी भाजपाचे सुरेश धस दिसत होते.
गेले महिनाभर आ. धस दररोज धनंजय मुंडेंच्या विरोधात आरोप करत आहेत. गरळ ओकत आहेत. “ मुंडेंच्या मैत्रिणी, मुख्य आरोपी कराडच्या भानगडी, मुंडेंनी कराडच्या मदतीने जमवलेली संपत्ती, कराडचा आका कोण, कराड हा छोटा आका तर मुंडे हा मोठा आका…” अशा प्रकारचे सनसनाटी भाष्य धस करत आहेत. त्यांनी बीडच्या वादात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचेही नाव घेतले, त्या नेहमी कशा बीडला येतात वगैरे ते बोलले तेंव्हा माळी संतापल्या. त्यांनी राज्य महिला आयोगाकडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बदनामी विरोधात तक्रारी केल्या. तेंव्हा धस माफी मागून मोकळे झाले. नाहीतर त्यांच्या विरोधात वेगळ्या कारवाया सुरु झाल्या असत्या. या सगळ्यात प्रश्न असा पडतो की आ. सुरेश धस यांना थांबवण्याचे प्रयत्न सरकारी गोटात झाले की नाहीच ? एकीकडे अजितदादा पवार म्हणाले की त्यांनी धस व बीड संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यशी सविस्तर चर्चा केली आहे. भाजपाचे प्रांताध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही तक्रार केली आहे. बावनकुळे सांगतात की आम्ही धस यांच्याशी बोललो आहोत. आणखी बोलू. पण धस काही मुंडेंच्या विरोधातली मोहीम थांबवताना दिसत नाहीत. याचा अर्थ काय ? भाजपाचे मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असताना, त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका सहकाऱ्यावर भाजपाचे आमदार तुटून पडतात, हीच मोठी विसंगती आहे. तीन तीन प्रकारच्या चौकशा सरपंच हत्या प्रकरणात सुरु आहेत. धस यांच्याकडे मुंडे व समर्थकांच्या विरोधात बरेच मटेरियल असेल तर मग त्यांनी सीआयडी वा पोलीस वा न्यायीक चौकशी कुणाकडेही जाऊन पुरावे सादर करायला काय हरकत आहे ? पण ते होत नाही. मित्रपक्षाच्या नेत्याचे कपडे फाडायचे जाहीर कार्यक्रम आ. धस रोज करत आहेत. असे असताना भाजपाचे नेते धस यांना आवरत नाहीत, याचा अर्थ भाजपाला पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंत्री मुंडे यांचे प्रतिमा हनन झाले तर हवेच आहे की काय ? दुसरीकडे अजितदादांच्या नेतृत्वातील घड्याळवाल्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या नेतृत्वातील तुतारीवाल्या गटाचे आमदार खासदार फोडण्याची मोहीम सुरु केली आहे का ? हा सरत्या सप्ताहातील दुसरा महत्वाचा राजकीय प्रश्न तयार झाला आहे. दादा परदेशातून परत पुण्यात आले तेंव्हाच ही बातमी फुटली की तुतारीवर निवडून आलेल्या सात खसादारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संपर्क करत आहेत.
बाप-लेकीला सोडून आलात तर स्वागत आहे, असे निरोप सुनील तटकरे देत आहेत अशा तक्रारी शरद पवारांच्या एका खासदाराने केल्या नंतर राजकीय वादळ उठले आहे. दादांचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी त्यात भर टाकली. तिकडचे अनेक खासदार आमदार व नेते आमच्या संपर्कात आहेत, असे मिटकरी म्हणाले. या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी चिडून दादागटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना फोन करून तटकरेंची तक्रार केली, अशीही बातमी झळकली. राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खा. सुनिल तटकरेंनी स्पष्ट केले आहे की मी कोणालाही फोन केला नाही. मूळ जाहीर तक्रार करणारे पवारांचे विदर्भातील खासदार अमर काळे यांच्या म्हणण्याला त्यांच्या पक्षातील कोणाही खासदाराने दुजोरा दिला नाही. उलट नीलेश लंके वगैरेनी ते आरोप खोडूनच काढले. म्हणजे मग नेमके काय झाले होते ? काय सुरु आहे ? महाराष्ट्रात आणखी एखादी पक्ष फूट होणार की काय ?