मुंबई : ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने स्पोर्ट्स फिल्डचे ११८ धावांचे आव्हान तब्बल ६ गडी आणि १७ चेंडू राखून पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या बाळकृष्ण बापट स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद कायम राखले. युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने १७.१ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ११९ धावा करत अंतिम विजय निश्चित केला. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेला बाळकृष्ण बापट स्मृती क्रिकेट स्पर्धेचा हा चौथा अंतिम सामना होता.
स्पोर्ट्स फिल्ड क्लबने प्रथम फलंदाजी करताना उभारलेल्या शतकी धावसंख्येत श्रीराम पालने २७  धावांचे योगदान दिले.सूरज लालवानी आणि अंकित क्षीरसागर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. उत्तरादाखल या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना विजेत्या संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा उचलला. अजय जयस्वालने ४७ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार ठोकत ६१ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोठा वाट उचलला. यावेळी जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक संजय गायतोंडे यांचा १७ वा जी.एस.वैद्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मुंबई क्रिकेट संघटनेचे कार्यवाह अभय हडप, सहकार्यवाह दिपक पाटील, मंगेश साटम, बिपीन वैद्य,सुरेंद्र हरमळकर, आनंद ए याल्वीगी, कुर्ला स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष डॉ नासिर दवे, कार्यवाह दाऊद खान, राजू तळपदे, जितेंद्र तामोरे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.  प्रल्हाद नाखवा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
संक्षिप्त धावफलक : अंतिम सामना :  स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब : २० षटकात ८ बाद ११८ ( श्रीराम पाल २७, सूरज लालवानी १३ धावांत २ बळी अंकित क्षीरसागर २४ धावांत २ बळी) पराभूत विरुद्ध युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन : १७.१ षटकात ४ बाद ११९ (अजय जयस्वाल ६१, केतन जोशी २१ धावांत २ बळी, शशांश कामत २१ धावांत २ बळी). सामनावीर : अजय जयस्वाल (युनायटेड)..
वैयक्तिक पारितोषिक विजेते : सर्वोत्तम फलंदाज : अजय जयस्वाल (युनायटेड), सर्वोत्तम गोलंदाज : रोहित जाधव (स्पोर्ट्स फिल्ड). सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : यश पै ( स्पोर्ट्स फिल्ड). स्पर्धेतील सर्वोत्तम : सागर शहा (युनायटेड).
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *