हरिभाऊ लाखे
नाशिक : सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेतून चार महिन्यांपासून सुरू असलेले सप्तशृंगी गड- नांदुरी घाट मार्गातील कड्याकडील बाजूस दरड प्रतिबंधक जाळी लावण्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.
सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी नांदुरीपासून १० किलोमीटर घाटरस्ता आहे. या घाट रस्त्यावर दरड कोसळणे, मोठे दगड पडून रस्ता बंद होण्याचे प्रकार बरेचदा झाले आहेत. काही भाविकांच्या वाहनांचे नुकसानही त्यामुळे झाले आहे. गडावर दररोज भाविकांची संख्या वाढतच असल्याने सावधगिरी म्हणून सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळ आणि ग्रामपंचायतीने घाट रस्त्याच्या कडेला दरड प्रतिबंधक जाळी (रॉकफॉल प्रोटेक्शन) लावून रस्ता सुरक्षित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने शासनाने सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेत या कामासाठी ३३ कोटी रुपये मंजूर केले होते. या कामाला २३ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सुरूवात झाली होती. यानंतर नवरात्रौत्सव, दिवाळी, नाताळ, नविन वर्ष दरम्यान काम बंद ठेवण्यात आले होते. सकाळी सहा ते ११.३० या वेळेत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत होता. यामुळे सप्तशृंगी गडावर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. आता काम पूर्ण झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे.
संपूर्ण घाट रस्त्याची पाहणी करण्यात आल्यानंतर डोंगरावरील सैल दगड काढून टाकण्यात आले. डोंगराच्या मध्यापासून रस्त्याच्या काठापर्यंत दरड प्रतिबंधक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. जेणेकरून पावसाळ्यात, उन्हाळ्यात सैल झालेले दगड खाली आल्यास ते जाळीमध्ये अडकतील किंवा रस्त्याच्या कडेला पडतील. कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही. यामुळे भाविकांचा प्रवास सुरक्षित होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *