रमेश औताडे
मुंबई : ज्या गोरगरीब रुग्णांना मुंबईत येऊन उपचार घेण्याची वेळ येत होती त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय त्या वेळी श्री संत गाडगे महाराजांनी ओळखून जी धर्मशाळा उभी केली त्या धर्मशाळा वास्तूचे आता लवकरच नऊ मजल्यात रूपांतर होणार असून रुग्णवाहिका घेऊन आलेल्या चालकांच्या राहण्याची सोय इथे केली जाणार आहे. भारतातील हि पहिली संकल्पना असणार आहे. अशी माहिती श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट चे प्रमुख विश्वस्त हेमंत सुधाकर सामंत यांनी दिली.
मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयासमोर असणारी ही धर्मशाळा आता ४५ रूम असणारी नवीन इमारत होणार आहे. त्याच्या बेसमेंटला रुग्णवाहिका पार्किंग करण्याची जागा ठेवली जाणार आहे. शिवाय रुग्णवाहिका घेऊन आलेल्या चालकाच्या राहण्याची सोय केली जाईल. या धर्मशाळेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५० रुपयांत राहण्याची सोय उपलब्ध होते. दोन वेळचे शिजवलेले अन्नदेखील मिळते.
झोपण्यासाठी अंथरुण, पांघरूण आणि खाटदेखील दिली जाते. जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघराची सुविधा देण्यात आली आहे. ही सर्व सुविधा फक्त ५० रुपयांत दिली जात असल्याने रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. २८ फेब्रुवारी १९९३ रोजी या धर्मशाळेचे भूमिपूजन झाले. सात वर्षांनी इमारतरूपी ही धर्मशाळा उभी झाली. या संस्थेचे कार्यक्षेत्र रुग्णांच्या नातेवाइकांच्या राहण्याच्या सोयीवर लक्ष केंद्रित असूनही त्यांना भोजन देणे, दूध आणि फळे देणे, महाग औषधे असतील तर त्यासाठी काही दात्यांचा शोध घेणे, वैद्यकीय शिबिरे भरवणे, भुकेलेल्यांना अन्नदान करणे अशा अनेक उपक्रमांतून धर्मशाळेचा अखंड प्रवास सुरू आहे. परळ येथील संत गाडगे महाराज धर्मशाळेत दिवसाला १०० लोक राहण्याची सोय आहे. या धर्मशाळेत १६ रूम असून, वर्षाला जवळपास साडेतीन हजार रुग्णांची सोय केली जाते.
कर्करोगग्रस्त लहान मुलांना अनेक महिने इथेच राहावे लागते. त्यांचे आई-वडील अनेकदा त्यांना पदपथावर झोपवतात. केईएम, वाडिया आणि टाटा या तीन महत्त्वाच्या रुग्णालयांतील रुग्णांसाठी ही धर्मशाळा खरंच आधार बनली आहे. मुलांना मनोरंजन म्हणून टीव्हीचीदेखील सोय आहे. या वास्तूची निर्मिती गुणवंतराव चराटे यांनी केली. स्वच्छतेवर भर देत आजही पंढरपूरच्या दिंडीत जवळपास ४०० ते ५०० स्वच्छता कर्मचारी सहभागी होतात. तिथला संपूर्ण परिसर स्वच्छ करतात, असेही सामंत यांनी सांगितले.
00000
