यजमान स्पोर्टिंग युनियन, भामा सी.सी. विजयी
मुंबई : सलामीच्या प्रिती अय्यरचे फटकेबाज शतक आणि तिने आयुषी इंदुलकर (२६) आणि अंजू सिंग (नाबाद ६७) यांच्यासह केलेल्या अनुक्रमे १०० आणि ११५ धावांच्या भागिदाऱ्या यामुळे भामा क्रिकेट क्लबला ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये जे भाटिय़ा क्रिकेट क्लबवर १३२ धावांनी मोठा विजय प्राप्त करता आला. स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या अन्य एका साखळी लढतीमध्ये यजमान स्पोर्टिंग युनियनने देखील ५ विकेटसनी महाराष्ट्र यंगला पराभूत केले. त्यांच्या या विजयामध्ये सलामीच्या प्रांजल मयेकर (५५) हिची महत्वपूर्ण भूमिका होती.
प्रितीच्या झंझावाता पुढे हतबल झालेल्या जे. भाटिया संघाला प्रतिस्पर्ध्यांच्या एक बाद २१५ या प्रचंड धावसंख्येला केवळ ९ बाद ८३ असे प्रतिउत्तर देता आले. प्रितीने ७२ चेंडूमध्ये नाबाद ११५ धावांच्या खेळीमध्ये १७ चौकार आणि ३ षटकार होते. अंजू सिंगने भाटियाच्या जखमांवर मीठ चोळताना केवळ २९ चेंडूत ६७ धावा फटकावताना ६ चौकार आणि ५ षटकारांची बरसात केली. अंजूने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करताना १२ धावात २ बळीही देखील घेतले.
कर्णधार सानया जोशी नाबाद ५२ हिच्या खेळीमुळे महाराष्ट्र यंगला ७ बाद १२१ अशी माफक धावसंख्या रचता आली. स्पोर्टिंगला ध्रुवी पटेल (३०) प्रांजल यांनी ८६ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर १०५ धावांवर दुसरी विकेट गमावण्या पाठोपाठ त्यांनी आणखी तीन विकेट गमावत काहीश्या तणावाखाली आपले लक्ष १८व्या षटकात पार केले.
आज माटुंगा जिमखाना येथे मुंबई क्रिकेटचे मानद सचिव अभय हड़प यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी अविसा आणि “एसजी”चे विजय कुमार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र यंग २० षटकात ७ बाद १२१ धावा (जयनी शाह २३, सानया जोशी नाबाद ५२, गगना मुल्का १५ धावात ३ बळी, तन्वी चव्हाण २० धावात २ बळी) पराभूत विरुद्ध स्पोर्टिंग युनियन १७.५ षटकात १२२ धावा (ध्रुवी पटेल ३०, प्रांजल मयेकर ५५, अनन्या अय्यर २८ धावात २ बळी, जैनी शाह १९ धावात २ बळी)
सर्वोत्तम प्रांजल मयेकर
भामा सी. सी. २० षटकात १ बाद २१५ धावा (प्रीती अय्यर नाबाद ११५, आयुषी इंदुलकर २६, अंजू सिंग नाबाद ६७) विजयी विरुद्ध जे. भाटिया सी. सी. २० षटकात ९ बाद ८३ (इशा शाह २१, सौम्या पान्डे २३ धावात २ बळी, अंजू सिंग १२ धावात २ बळी, चांदनी कनुजिया १० धावात ३ बळी) सामन्यात सर्वोत्तम प्रिती अय्यर.
00000
