नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने जारी केलेल्या 31 डिसेंबर 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार 14 ते 28 जानेवारी या कालावधीत सर्वत्र ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असल्याने यावर्षीचा ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अधिक उत्साहाने साजरा होत आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेनेही आयुक्त डॉ.कैलास शिेदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून मान्यवरांच्या व्याख्यानांसोबत अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या मराठी साहित्यप्रेमाला व प्रतिभेला संधी उपलब्ध करून देत साहित्यविषयक स्पर्धात्मक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.
या पंधरवडा कालावधीतील कार्यक्रमांतून संपन्न अशा अभिजात मराठी भाषेचा प्रचार – प्रसार व्हावा तसेच कार्यालयीन कामकाजातही मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर व्हावा अशाप्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये – गुरूवार, 16 जानेवारी, सकाळी 11 वा. शासकीय कामकाजात सुयोग्य मराठीचा वापर या अनुषंगाने ‘कार्यालयीन टिप्पणी व मराठी सुलेखन’ या विषयावर महाराष्ट्र शासनाचे निवृत्त उपसचिव वसंत चौधरी यांचे माहितीपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
मराठी कवितेचा समृद्ध वारसा जपत नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक अधिकारी, कर्मचारी कविता लिहितात. त्यांच्या काव्यगुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील प्रतिभादर्शन घडावे यादृष्टीने नमुंमपा अधिकारी – कर्मचारी यांचेकरिता सोमवार, 20 जानेवारी  सकाळी 11 पासून ‘स्वकवितावाचन स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे.
मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचा आनंद व अभिमान व्यक्त करीत सुप्रसिध्द साहित्यिक, व्याख्याते डॉ.महेश केळुसकर यांचे ‘मायबोली अभिजात मराठी’ या विषयावर व्याख्यान मंगळवार, 21 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.
मराठी साहित्य संपदेत विविध चरित्रे – आत्मचरित्रे यांचे स्थान बहुमोल आहे. त्यांच्यामुळे जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी तयार होते, तसेच ती अनुभव समृध्द करतात. हे लक्षात घेत नमुंमपा अधिकारी – कर्मचारी यांचेकरिता बुधवार,  22 जानेवारी सकाळी 11 वा. ’मला भावलेले चरित्र – आत्मचरित्र’ या विषयावर ‘अभिवाचन स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचारी त्यांना भावलेल्या चरित्र – आत्मचरित्राची संक्षिप्त माहिती देत त्या पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन करतील, जेणेकरून ते ऐकून ते पुस्तक वाचण्याची उत्सुकता श्रोत्यांच्या मनात उत्पन्न होईल.
आपल्या कथा, कादंब-या, नाटके आणि ललित लेखनाने मराठी साहित्यविश्व समृध्द करणा-या सुप्रसिध्द साहित्यिक जयवंत दळवी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त सुप्रसिध्द लेखिका डॉ.निर्मोही फडके यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘स्मरणखुणा : जयवंत दळवी’ हा विशेष कार्यक्रम शुक्रवार, 24 जानेवारी रोजी सायं. 4 वा. संपन्न होत आहे. यामध्ये त्यांच्यासमवेत नामांकित अभिनेते योगेश केळकर व अभिनेत्री सौ.वंदना गुजरे हे कलावंत जयवंत दळवी यांच्या साहित्याचे अभिवाचन करणार आहेत.
याशिवाय मंगळवार, 28 जानेवारी सकाळी 11 वा. मराठी भाषेला लाभलेल्या अभिजात भाषेच्या दर्जास अनुसरून नमुंमपा अधिकारी – कर्मचारी यांची ‘अभिजात मराठीची पुढील वाटचाल’ या विषयावर ‘वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी – कर्मचारीवृंदासाठी आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता त्या त्या स्पर्धा दिनांकाच्या आधीच्या कार्यालयीन दिवसापर्यंत सहभाग इच्छुक अधिकारी – कर्मचारी यांनी आपली नावे माहिती व जनसंपर्क विभागात नोंदवावयाची आहेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी 8169812997 / 8689811582 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे सूचित करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका नावाप्रमाणेच कोणताही उपक्रम, कार्यक्रम नाविन्यापूर्ण संकल्पना राबवित साजरा करीत असून अभिजात मराठीचा अभिमान प्रदर्शित करीत मायबोली मराठीचा जागर करताना महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त अभिनव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे कार्यक्रम अनुभवण्यासाठी साहित्य व भाषाप्रेमी नवी मुंबईकर नागरिक रसिक म्हणून सहभागी होऊ शकतात, त्यांचे महानगरपालिकेच्या वतीने स्वागत असेल असे आवाहन कार्यक्रमांचे मुख्य संयोजक अतिरिक्त आयुक्त  सुनिल पवार यांनी केले आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *