कल्याण : कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालय या शाळेसाठी प्रवासी बस आल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंता दूर झाली आहे. सद्यस्थितीत मराठी शाळांना लागलेल्या विद्यार्थ्यांच्या गळतीला अनेक शाळा सामो-या जात असताना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दिमाखात उभी असलेली ही शाळा म्हणजे नूतन विद्यालय. 14 ते 15 किमी वरून येणारे आदिवासी समाजाचे विद्यार्थी या शाळेची निवड करायचे. पण प्रश्न असायचा ने- आण करण्यासाठी वाहतुकीचा. मागेल त्याला शिक्षण हे व्रत घेतलेल्या छत्रपती शिक्षण मंडळाची ही शाळा. शिक्षणाची जिज्ञासा असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न स्कूलबस देणगी स्वरूपात सोडवला, तो रिजेंसी फाऊंडेशचे चेअरमन महेश अग्रवाल यांनी.
शाळेच्या प्रांगणात स्कूलबसचे अनावरण सुमनलता अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासमवेत रामकिशोर अग्रवाल उपस्थित होते. सुमनलता यांनी उपस्थितांना सत्संगाचे जीवनात असलेले महत्व अधोरेखित केले. लक्ष्मण अग्रवाल यांचा ही देणगी मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे. या सोहळ्या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे, सरचिटणीस डॉ. निलेश रेवगडे इतर पदाधिकारी व सदस्य तसेच संस्थेचे जेष्ठ सभासद आत्माराम जोशी व माजी विद्यार्थी, पालक शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. त्यावेळी शाळेचे नूतनीकरण व बसची स्वप्नपूर्ती झाल्याची सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. श्रीकांत तरटे यांनी विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूलबसचे महत्व स्पष्ट केले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वेदपाठक यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले असल्याची माहिती शाळेच्या जेष्ठ शिक्षिका शुभांगी भोसले यांनी दिली.
00000