बाळासाहेब तोरसकर
नवी दिल्ली, १५ जानेवारी २०२५: ठाण्यातील बदलापूर येथील शिवभक्त विद्या मंदिर शाळेचे क्रीडा प्रशिक्षक श्री. नरेंद्र मेंगळ आणि श्री. पंढरीनाथ म्हसकर यांच्या मार्गदर्शनाने आणि अथक मेहनतीने कुमारी रेश्मा सुभाष राठोड हिने खो-खो वर्ल्ड कप २०२५ साठी भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे. या यशाने संपूर्ण शाळा, प्रशिक्षक आणि तिच्या कुटुंबीयांसाठी गौरवाचा क्षण निर्माण केला आहे. नरेंद्र मेंगळ सरांच्या मार्गदर्शनामुलेच खो-खो वर्ल्डकप पर्यंत पोहचू शकले असे रेशमाने अभिमानाने सांगितले. त्याच बरोबर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव व खजिनदार अॅड गोविंद शर्मा यांचेही चांगले मार्गदर्शन मिळाल्याचे तिने आवर्जून सांगितले.
रेश्माच्या सोबतच वर्ल्ड कप निवड चाचणीसाठी प्रियांका भोपी हिचाही समावेश होता पण रेश्माची निवड झाली. दोन्ही खेळाडूंना आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि मेहनत घेणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकांचेही कौतुक केले.
रेश्माचा प्रेरणादायी प्रवास
रेश्माने २०१० मध्ये, इयत्ता पाचवीत असताना, शिवभक्त विद्या मंदिरच्या मैदानावर खो-खो सराव सुरू केला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही तिच्या आई-वडिलांनी शिक्षण आणि खेळासाठी मोठा त्याग केला. कुटुंबाच्या कष्टाच्या जोरावर रेश्माने आपल्या खेळातील आवड जोपासली. तिच्या कौशल्यावर विश्वास ठेवत प्रशिक्षक मेंगळ सर आणि म्हसकर सर यांनी तिला योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले.
खेळातील वाटचाल आणि यश
रेश्माने आपल्या मेहनतीने अनेक अडथळ्यांवर मात करत खो-खोच्या मैदानावर आपले स्थान निर्माण केले. किशोरी गटातच तिने आपल्या खेळाची चुणूक दाखवली. दिल्ली येथे झालेल्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात ती यशस्वी ठरली. त्या कामगिरीसाठी तिला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार आणि पाच लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळाली.
त्यानंतर, जानकी पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर तिचा आत्मविश्वास वाढला आणि तिने अधिकाधिक सरावाला वाहून घेतले. महिला गटातही तिच्या कामगिरीने तिला महाराष्ट्राच्या संघात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत तिने सात लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले आणि आपल्या घरची परिस्थिती सुधारण्यास हातभार लावला.
वर्ल्ड कपसाठी निवड आणि पुढील वाटचाल
नाशिक येथील क्रीडा कार्यालयात कार्यरत असलेल्या रेश्माने अखंड चौदा वर्षे कठोर परिश्रम करून अखेर खो-खो वर्ल्ड कपसाठी भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे. दिल्ली येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत तिचा सहभाग हा तिच्या मेहनतीला मिळालेला योग्य सन्मान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *