५ कोटी ८५ लाखांची वीजचोरी उघड
भांडुप : महावितरणच्या भांडुप परिमंडलात अधिक हानी असलेल्या वीजवाहिन्यांवर गेल्या पाच महिन्यांमध्ये व्यापक शोध मोहीम राबवून तब्बल ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका देण्यात आला. त्यांच्याकडील ५ कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले आहे. अधिक हानी असलेल्या ६० वीजवाहिन्यांवरील सदोष मीटर बदलणे, नवीन वीजजोडणी, कमकुवत वीजतारा बदलणे आदीं विविध उपाययोजनांमुळे महसुलात ४० लाख १४ हजार ५४१ युनिट विजेची भर पडली आहे.
ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ दरम्यान आखण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये ठाणे मंडल कार्यालयांतर्गत २५८ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ७९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. वाशी मंडल कार्यालयातील ४०२ जणांकडे ३ कोटी ४७ लाख रुपयांची वीजचोरी सापडली. तर पेण मंडल कार्यालयातंर्गत १९३ जणांकडे ५९ लाख रुपयांची वीजचोरी आढळली. तर अधिक वीज हानी असलेल्या ६० वाहिन्यांवरील ४ हजार ६५२ सदोष वीजमीटर बदलण्यात आले. ४ हजार ३४५ जणांनी नवीन वीजजोडणी देण्यात आली. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या १२४ ग्राहकांना पुनर्रजोडणी देण्यात आली. १३.४ किलोमीटर कमकुवत वीजतारा बदलण्यात आल्या व जवळपास १० किलोमीटर एरिएल बंच (इन्सुलेशन असलेली वाहिनी) बसवण्यात आली. परिणामी ठाणे मंडलात १० लाख २७ हजार ६७ युनिट, वाशी मंडलात सर्वाधिक २१ लाख ७९ हजार ४६१ आणि पेण मंडलात ८ लाख ८ हजार १३ युनिट विजेची वाढ नोंदवण्यात आली आहे.
मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, ठाणे मंडलाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम आणि पेण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली अभियंते, अधिकारी, जनमित्रांच्या चमुने ही कामगिरी केली.
00000