प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभमेळ्यात देश-विदेशातील कोट्यवधी संत आणि भक्त जमले आहेत. महाकुंभाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा मोठा प्रभाव पडतो. लोक महाकुंभात श्रद्धेने डुंबत असताना अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. यंदाच्या महाकुंभमेळ्यामध्ये चार लाख कोटी रुपयांहून अधिक कमाई होऊ शकेल, असा अंदाज आहे.
45 दिवस चालणाऱ्या या महान उत्सवामध्ये संगमाच्या काठावर 40 कोटींहून अधिक लोक जमण्याची अपेक्षा आहे. उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभसाठी सात हजार कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे. सुमारे चार हजार हेक्टरमध्ये आयोजित या महामहोत्सवाची सांगता 26 फेब्रुवारीला होणार आहे. या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत दोन लाख कोटी रुपयांची भर पडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. येथे जमणारे अंदाजे 40 कोटी लोक सरासरी 5,000 रुपये खर्च करतात. यातून राज्य सरकारला दोन लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
देशाचा जीडीपीही वाढेल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या महाकुंभमेळ्यात प्रति व्यक्ती सरासरी खर्च दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत दोन लाख कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा चार लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. यासह नाममात्र आणि वास्तविक जीडीपी एक टक्क्याने वाढण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की 2019 मध्ये प्रयागराज येथे झालेल्या अर्ध कुंभ मेळ्याने उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांची भर घातली होती. त्या वेळी सुमारे 24 कोटी भाविक आले होते. या वर्षी 40 कोटी भाविक येण्याची शक्यता असून, त्यातून दोन लाख कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे.
विदेशातूनही भाविकांचा ओघ
यंदाचा हा श्रद्धेचा उत्सव विशेष आहे. कारण 12 वर्षांनंतर आयोजित होणाऱ्या या महाकुंभात 144 वर्षांचा अद्भूत योगायोग घडत आहे. देशातूनच नव्हे, तर रशिया, अमेरिकेसारख्या देशांमधूनही भाविकांचा ओघ असेल. या काळात लोक पॅकेज्ड अन्न, पाणी, बिस्किटे, दिवे, तेल, अगरबत्ती, धार्मिक पुस्तके इत्यादींसह अनेक वस्तू खरेदी करतील. याशिवाय निवास आणि प्रवासावर मोठा खर्च होणार असल्याने राज्यासह देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
