अनिल ठाणेकर
महापालिका आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरीत सामावून घेणेबाबत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करावी अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्त सौरभ राव यांना केली आहे. याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागाला आदेश देवून कार्यवाही करण्याबाबत सूचित केले असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. या संदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर मिनाक्षी शिंदे, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे उपस्थित होते.
महापालिका आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने सन २०१८ पर्यंत नोकरीत सामावून घेतले जात होते. परंतु त्यानंतर केवळ अनुसूचित जाती या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यात यावे असा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता, या निर्णयामुळे इतर प्रवर्गातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता. या संदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी महापौरपदी असताना तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करुन सरसकट सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत घेण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. एकनाथ शिंदे यांनी सदर विषय विधानसभेत मांडून संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने शासनाने सन 2023 मध्ये पुनश्च शासन निर्णय प्रसिद्ध करुन सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत घेणेबाबत आदेश दिले. परंतु या निर्णयाला देखील 21 दिवसामध्ये पुन्हा मा. न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे सफाई कामगारांचा प्रश्न हा ‘जैसे थे’च होता .या शासन निर्णयानुसार केवळ अनुसूचित जातीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरीत सामावून घेतले जात होते. त्यामुळे इतर प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नरेश म्हस्के यांनी सततचा पाठपुरावा सुरू ठेवला होता, याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील मा. न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेवर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता. नुकताच औरंगाबाद खंडपीठाने सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे व याची अंमलबजावणी संबंधित आस्थापनांनी असेही नमूद केले आहे. सदर निर्णयानुसार ठाणे महापालिका आस्थापनेकडील वारसाहक्काची प्रकरणे निकाली काढावीत अशी चर्चा खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत केली असून आयुक्तांनी देखील संबंधित विभागाला तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करुन सफाई कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळवून दिल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
०००००
