मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणीसाठी कार्यवाही करा – डॉ. राजेश देशमुख
अशोक गायकवाड
नवी मुंबई :राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित करुन दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची कोकण भवनामध्ये प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. तसेच ‘अभिनव पहल’ ही भारत सरकारची एक योजना आहे. या योजनेचा मख्य उद्देश प्रशासकीय सुधारणा करणे आणि सार्वजनिक तक्रारींचे निवारण करणे हा आहे, अशी माहितीही डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी व नियोजनाच्या संदर्भात कोकण महसूल आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवार,(दि.१४) कोंकण भवनातील पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात कोकण भवनातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस अप्पर आयुक्त (सामान्य शाखा) संजीव पलांडे, अप्पर आयुक्त (महसूल) नितिन महाजन, सह आयुक्त (पुनर्वसन) अमोल यादव तसेच कोकण भवनातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी (दि .१४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनूसार कार्यालयाचे वेबसाईट अद्ययावत करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहिम राबविणे, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, शासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय दौरे करतांना त्याठिकाणच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाडयांना भेट देणे, शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण भवनातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी आयुक्तांनी विशेषत: कोकण भवन इमारतीच्या परिसराच्या व कार्यालयांच्या सखोल स्वच्छतेचे निर्देश दिले. कार्यवाहीतील जप्त साहित्य, वाहन आदी पडून असल्यास त्यांच्या निर्लेखनाची कार्यवाही करणे, इमारतीच्या आतील बाजूस आणि दर्शनी भागात लावण्यात आलेले माहिती फलक अद्यावत करणे, अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची योग्य सुविधा, अभ्यागत कक्षांची व्यवस्था अद्यावत करणे यासर्व बाबींवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. यासर्व कामांचा साप्ताहिक आढावा घेण्यात येईल अशा सूचनाही आयुक्त डॉ. देशमुख यांनी यावेळी दिल्या. आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी ‘अभिनव पहल’ या योजनेची माहिती दिली. ‘अभिनव पहल’ ही भारत सरकारची एक योजना आहे. या योजनेचा मख्य उद्देश प्रशासकीय सुधारणा करणे आणि सार्वजनिक तक्रारींचे निवारण करणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून नवनवीन संपकल्पना, नावीन्यपूर्ण उपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेच्या हितासाठी शासकीय काम सुलभ व सोपे होण्याच्या दृष्टीने नवनवीन उपक्रम, संकल्पना तयार करुन त्या ‘अभिनव पहल’ योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड कराव्यात. जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या योजनेत भाग घ्यावा, असे आवाहन ही आयुक्त डॉ. राजेश देशमुख यावेळी यांनी केले.
00000
