पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. शहरातील मध्यभाग, उपनगर, पेठांसह बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी वाढली आहे. या ठिकाणांहून वाहन चालकांना मार्ग काढणे, आणि नागरिकांना चालणे देखील मुश्किल झाले आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीने दररोज पुणेकरांना जीव मुठीत धरावा लागत आहे. त्यामुळे पुणेकर अक्षरशः वैतागले असून पुण्यातील या वाहतूक कोंडीत पुणेकरांचा श्वास घुसमटत आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीवर आता जगाने ही शिक्कामोर्तब केले आहे. टॉम टॉम या जागतिक संस्थेने जगातील ६२ देश आणि ५०० शहरांमधील रहदारीची माहिती संकलन करून ट्रॉफीक इंडेक्स २०२४ नावाचा अहवाल सादर केला. या अहवालात जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अहवालात जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या पाच शहरांमध्ये कोलाकोता, बेंगळुरू आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. या अहवालात सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरात कोलकाता दुसऱ्या तर पुण्याचा चौथा क्रमांक लागत असल्याचे नमूद केले आहे. जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरात पुण्याचा चौथा क्रमांक लागतो ही पुणेकरांसाठी भूषणावह बाब नसून चिंताजनक बाब आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दहा किलोमीटरच्या प्रवासासाठी पुणेकरांना ३३ मिनिटे २२ सेकंद लागतात. पुणेकरांचा सर्वाधिक वेळ हा प्रवासातच जातो. पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीला अनेक कारणे आहेत त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे वाहनांची बेसुमार वाढती संख्या. एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आज लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक आहे दरवर्षी त्यात भरच पडत आहे. वाढत्या वाहनांमुळे रस्ते अपुरे पडत आहे. अरुंद रस्ते आणि त्यावर फोफावलेली अतिक्रमणे यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. पुण्यातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी साधारणपणे एक हजार वाहतूक पोलीस रस्त्यावर असतात. पुणे शहराचा विस्तार मुंबईपेक्षा जास्त आहे. वाहतूक पोलिसांना उपलब्ध मनुष्यबळात काम करावे लागते. वाहतूक कोंडीला पोलिसांना दोषी ठरवले जाते. मात्र यात पोलिसांचा काहीही दोष नाही. पुण्यातील वाहतूक कोंडी रोखायची असेल वाढत्या वाहनांना आळा घालवा लागेल आणि वाढत्या वाहनांना आळा घालायचा असेल तर पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. जर पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली तर लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर करतील त्यामुळे वाढत्या वाहनांना आळा बसेल आणि वाढत्या वाहनांना आळा बसला की वाहतूक कोंडीही कमी होईल आणि वाहतूक कोंडी कमी झाली की पुणेकरांना मोकळा श्वास घेता येईल.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *