आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये तीव्र संताप
मुंबई : मालवण तालुक्यातील तोंडवळी गावातील ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा बंद करण्याच्या मागणीसाठी गड नदीच्या पात्रात उतरुन साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. गेले अनेक दिवस गड नदीच्या पात्रातून कालावल, हडी तसेच तोंडवळी गावच्या नदीपात्रातून शेकडो मजुरांच्या साहाय्याने रात्रंदिवस अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे. ही बाब तोंडवळी ग्रामस्थांनी वेळोवेळी सातत्याने लेखी पत्रव्यवहार करून मालवणचे तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या कानी घातली होती. या अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष तक्रारीही करण्यात आल्या आहेत. असे असतांनाही वाळू माफियांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. स्थानिक महसूल यंत्रणा ग्रामस्थांच्या तक्रारींकडे काणाडोळा करीत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. बेसुमार अवैध वाळू उपसा होत असल्याने तसेच पावसाळ्यानंतर जमीन खचल्याने नदीकिनारी घरे असलेल्या लोकांच्या घरांना तडे जात आहेत. अखेर सहनशीलतेचा अंत होत आल्याने ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने तोंडवळी ग्रामस्थांनी गड नदीच्या पात्रात उतरुन साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. तोंडवळी गावचे उपसरपंच दशरथ वायंगणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु असून आंदोलनाची पूर्वसूचना देऊनही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *