अनिल ठाणेकर
ठाणे :सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशन, ठाणे या केंद्र शासनाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेने ठाण्यात सीजीएचएसचे वेलनेस सेंटर (केंद्रीय स्वास्थ्य योजना) सुरू व्हावे यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय पातळीवर पाठपुरवा केल्यामुळे अवघ्या काही महिन्यांतच चरई येथील एमटीएनएल मधील जागा (वेलनेस सेंटर) आरोग्य केंद्रासाठी मंजूर झाली आहे. या निर्णयामुळे ठाणे जिल्हा आणि परिसरातील १ लाखाच्यावर विद्यमान केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे.
सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशन, ठाणे हे गेली अनेक वर्ष सीजीएचएसचे वेलनेस सेंटर ठाण्यात सुरु व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यश मिळत नव्हते. एकदा हा प्रस्ताव केंद्र सरकारने नामंजूरही केला होता. असोसिएशनने शिष्टमंडळासह खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधून चर्चा करत लवकरात लवकर हा प्रस्ताव मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय पातळीवर चक्रे फिरली. एमटीएनएलचे अधिकारी, सीजीएचएस अधिकारी व असोसिएशनचे पदाधिकारी यांनी तीन महिन्यांपूर्वी चरईतील जागेची पाहणी केली. त्यानंतर सीजीएचएसने याबाबतचा प्रस्ताव एमटीएनएलकडे पाठवला. एमटीएनएलने हा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय आरोग्य खात्याकडे पाठविला. खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत जोरदार हालचाली करून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे पाठपुरवा करुन ठाण्यातील चरई येथील एमटीएनएलचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. एमटीएनएल येथील जागा ही प्रशस्त ३००० चौरस फूटात आहे. या जागेपोटी एमटीएनएलला केंद्र शासनकडून खासदार नरेश म्हस्के यांनी वार्षिक भाडेही मंजूर करुन घेतले आहे. रेल्वे विभाग सोडून केंद्र सरकारचे सर्व विभाग, कस्टम, आयकर, नेव्ही, बीएसएनएल, एमटीएनएल, एअर इंडिया, पोस्ट आदी सर्व विभाग तसेच संसद सदस्य यांना या आरोग्य केंद्राचा मोफत लाभ घेता येणार आहे. सरकार स्वास्थ्य आरोग्य योजने अंतर्गत केंद्र सरकारचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांचा यात समावेश आहे. या योजनेत सध्याचे कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा समावेश होतो. पात्र कुटुंब सदस्यांमध्ये जोडीदार, आश्रित पालक, 25 वर्षांपर्यंतची आश्रित मुले आणि अविवाहित मुलींचा या योजनेत समावेश आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. असोसिएशनने अध्यक्ष सुभाष पटवर्धन, सचिव शरद भोळे, उपाध्यक्ष अरुण राऊत, खजिनदार चंद्रकांत कांबळे यांनी संघटनेच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेत आभार मानले आहेत.
0000
