हरिभाऊ लाखे
नाशिक : वर्दळीचे ठिकाण, विशिष्ट काळात होणारी गर्दी आणि ना फेरीवाला क्षेत्राचा अभ्यास करून आकारास आलेल्या, परंतु करोनापश्चात ठेकेदाराच्या कार्यपद्धतीने बारगळलेल्या शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांना नव्याने पुनरुज्जीवित करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. सशुल्क (पे ॲण्ड पार्क) तत्वावर ही वाहनतळे चालविण्यासाठी त्रयस्त्र यंत्रणेला दिली जाणार आहेत. तसेच शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्यात येणार आहे.
शहरात वाहतूक कोंडी आणि वाहनतळाचा प्रश्न उग्र स्वरुप धारण करत आहे. अनेक व्यावसायिक आणि निवासी संकुलात वाहनतळाची व्यवस्था नसल्याने मुख्य रस्त्यांवर, लगतच्या परिसरात वाहने जिथे जागा मिळेल, तिथे उभी केली जातात. वाहनांच्या गर्दीमुळे रस्त्यावरील वाहतुकीत अडथळे येतात. वाहतूक कोंडी होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने स्मार्ट वाहनतळाची संकल्पना प्रत्यक्षात आणली होती. त्या अंतर्गत २८ ठिकाणी रस्त्यावर तर, पाच ठिकाणी रस्त्यालगतची जागा वाहनतळासाठी निश्चित करण्यात आली होती. संबंधित ठिकाणी चिन्हांकन होऊन प्रायोगिक तत्वावर ठेकेदारामार्फत ते सुरू करण्यात आले होते. करोना काळानंतर मात्र संबंधितांचे स्वारस्य संपले. सवलती आणि तत्सम मागण्या करुन त्याने यातून अंग काढून घेतले. स्मार्ट सिटी कंपनीने ३३ वाहनतळांची जागा महापालिकेच्या स्वाधीन केली. तेव्हापासून वाहनतळासाठी निश्चित झालेल्या जागा पडून आहेत. काही ठिकाणी वाहनधारक त्यांचा वापर करतात. मात्र महापालिकेला कुठलेही उत्पन्न मिळत नाही. वाहनतळाचा प्रश्नही कायम आहे.
या पार्श्वभूमीवर, वाहनतळ व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी विविध वाहनतळांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यात ३३ स्मार्ट वाहनतळातील काहींचा समावेश होता. वाहनतळाअभावी निर्माण झालेल्या समस्यांचा त्यांनी आढावा घेतला. अनधिकृत वाहनतळाला पर्याय आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी केली. ३३ वाहनतळे चालविण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. पैसे देऊन वाहने उभी करा‘ अर्थात पे ॲण्ड पार्क तत्वावर ती कार्यान्वित होतील.
मनपाकडून सुविधांची पूर्तता
शहरात रस्त्यावर २८ आणि रस्त्यालगतच्या पाच ठिकाणी अशी आधीच निश्चित झालेली एकूण ३३ वाहनतळे पुनरुज्जिवित करण्यात येणार आहेत. बाह्य यंत्रणेमार्फत (आऊट सोर्स) ही वाहनतळे चालविली जातील. या ठिकाणी स्वच्छता व मूलभूत सुविधाची पूर्तता महापालिका करणार आहे. – मनिषा खत्री (आयुक्त, नाशिक महानगरपालिका)
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *