अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी साधला संवाद
ठाणे :पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे ही समाज म्हणून आपली सगळ्यांची अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे आजवरप्रमाणेच मूर्तीकारांनी महापालिकेस सहकार्य करावे. त्यासाठी मूर्तीकारांना आवश्यक असलेली जागा, शाडूची माती यांची उपलब्धता महापालिकेकडून करण्यात येईल, अशी ग्वाही ठाणे महापालिकेच्या वतीने मूर्तीकारांसोबत गुरूवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली.
पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत मा. उच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्याअनुषंगाने, मूर्तीकारांशी चर्चा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने गुरूवारी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत, ठाणे महापालिका क्षेत्रातील मूर्तीकार संघटना, गणेशोत्सव समन्वय समिती, स्वयंसेवी संस्था यांच्याशी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी संवाद साधला. त्याप्रसंगी उपायुक्त (पर्यावरण विभाग) डॉ. पद्मश्री बैनाडे, उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, विधि अधिकारी मकरंद काळे उपस्थित होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती शाडूच्याच असाव्यात असे आता स्पष्ट निर्देश आहेत. त्यासंदर्भात, मूर्तीकारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. म्हणून जानेवारी महिन्यातच यासंदर्भात चर्चा घडवून आणल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले. सगळ्यांच्या आरोग्याचा, प्रदूषणाचा हा विषय असल्याने त्यातून मार्ग कसा काढायचा, सामंजस्याने त्यावर काय तोडगा काढता येईल यासाठी ही बैठक असल्याचे माळवी यांनी सांगितले.
मूर्ती बनविण्यासाठी जागा, शाडूची माती, विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा महापालिकेमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपण २००५पासून कृत्रिम तलावांची विसर्जन व्यवस्था उभी करून सगळ्यांसाठी ठाणे शहराने आदर्श घालून दिला आहे. त्याच धर्तीवर पीओपीच्या एेवजी शाडूच्या मूर्ती करण्यातही ठाण्यातील मूर्तीकारांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महापालिका करेल, असे माळवी यांनी सांगितले.
तर, मूर्तींचे विसर्जन व्यवस्थित व्हावे. त्यात त्यांना काही इजा पोहोचू नये, यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. हा वैयक्तिक विषय नसून जनहिताचा आहे. त्याचा आपण मान राखायला हाव. मूर्तीकारांचे कोणतेही नुकसान होऊ नये, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळेच उत्सवाच्या खूप आधीच, जानेवारी महिन्यात बैठक घेत असल्याचे अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी गणेशोत्सवात आणलेल्या मूर्तींपैकी ३० टक्के मूर्ती या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या होत्या. महापालिकेने पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच, शाडूची माती व जागाही उपलब्ध करून दिली होती. त्याचबरोबर, पर्यायी विसर्जन व्यवस्थाही केली होती, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.
या बैठकीत, जनहित याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी कायद्याची लढाई सुरूच राहील, पण आपण सगळ्यांनी समंजसपणे वागून पुढील पिढ्यांचा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. ठाणे खाडी क्षेत्र हे रामसार क्षेत्र जाहीर झाले असल्याने आपली जबाबदारी वाढली आहे, असे मत मांडले.
मूर्तीकार संघटनेतर्फे विजय बोळींजकर यांनी हळूहळू शाडूच्या मूर्तींचा प्रसार होत राहील, असे सांगितले. तसेच, याविषयी न्यायालयात मूर्तीकारांची बाजू मांडत असल्याचीही माहिती दिली.
ठाणे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत, तसेच, शुभम चिखले, मंगेश पंडित, साक्षी गांधी, नागोठणेकर यांनी मूर्तीकारांसमोर असलेले प्रश्न या बैठकीत मांडले. बाहेरून येणाऱ्या मूर्ती, उत्सवापूर्वी सर्वत्र लागणारे मूर्ती विक्रीचे स्टॉल्स, भाविकांची पसंती आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. शाडूच्या मूर्ती बनविण्यास लागणारा वेळ, त्याची घ्यावी लागणारी काळजी आदी विषय उपस्थित केले. तसेच, शाडूच्या मूर्तींची उपलब्धता, त्यात होत असलेले प्रयोग, मूर्तींसाठी भाविकांकडून स्वीकारले जाणारे इतर पर्याय यांचीही सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली.
महापालिकेने मूर्ती विक्रीसाठी परवाना घेणे बंधनकारक करावे. मूर्ती विक्रीचा किती वर्षांचा व्यवसाय आहे हेही पहावे, असा आग्रह या बैठकीत धरण्यात आला. मॉलमध्ये विक्रीसाठी काऊंटर, विक्रीच्या स्थानांची प्रसिद्धी करण्यात येईल, असे या बैठकीत महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *