रमेश औताडे
मुंबई : सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्टअपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस कोटी रुपयांची तरतूद करणार व काळाची गरज ओळखून स्टार्ट अप धोरणाचा नवीन मसुदा तयार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस’ जाहीर कार्यक्रमात गुरुवारी दिली.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील,आयुक्त प्रदीपकुमार डांगे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी तसेच देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १००० स्टार्टअप या कार्यक्रमात उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, नवं उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे. देशात स्टार्टअप सुरू झाले तेव्हा ४७१ स्टार्ट अप होते आज देशात एक लाख ५७ हजार आहेत. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त मला अभिमानाने सांगावेसे वाटते की महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात २६ हजार स्टार्ट अप आहेत.
आपण असे अभियान राबवित आहोत की ज्यामध्ये महिला स्टार्टअप मध्ये सर्व पदांवर असतील. देशात जास्त महिला डायरेक्टर असलेले महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे असेही ते म्हणाले.
००००
