अनिल ठाणेकर
ठाणे :तिसरी घंटा या संस्थेच्या सेक्स ऑन व्हील या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या कोकण चषकचे मानकरी ठरले. सर्वोत्कृष्ट एकांकिकामध्ये द्वितीय क्रमांक चीनाब से रावी तक तर तृतीय क्रमांक गूड बाय किस या एकांकिकेने पटकावला. उत्तेजनार्थ म्हणून जापसाल आणि खेळ मांडला यांची निवड करण्यात आली. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कोकण कला अकादमी, संस्कार आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण चषक २०२५ या खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला.
आमदार संजय केळकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप ढवळ, माजी उपमहापौर सुभाष काळे, अंतिम फेरीचे परीक्षक, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि जेष्ठ साहित्यिक अशोक बागवे, शीतल तळपदे यांच्यासह प्राथमिक फेरीचे परीक्षक मकरंद पाध्ये, राजेश भोसले, स्पर्धेचे संयोजक प्रा. मंदार टिल्लू, सतीश आगाशे, विजय चावरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. आ. केळकर म्हणाले की, खुली कोकण कला अकादमीचे हे व्यासपीठ अत्यंत ताकदीचे आहे. या स्पर्धांमधून सिनेमा, मालिका आणि व्यावसायिक रंगभूमीला अनेक कलाकार मिळतात. यावर्षीपासून वेशभूषेला देखील पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षकांच्यावतीने बागवे म्हणाले की, नाटक ही समूह कला आहे. नाटककार, दिग्दर्शक, कलाकार, नेपथ्य, प्रेक्षक हे एकरूप झाले की नाटक फुलते आणि त्याचा डेरेदार वटवृक्ष पाहायला मिळतो. या नाटकातील एक घटक जरी कमी पडला तरी नाटक पूर्णपणे पडते. जर कलाकार भूमिकेशी समरस झाला नाही तर त्याचे व्यक्तिमत्व उठून दिसत नाही. संवाद संघर्षातून निर्माण झालेले नाटक प्रेक्षकांना कळते. नाटकातील भाषा ही प्रभावी असावी. जे रंगाकडून अंतरंगाकडे जाते त्याला नाटक म्हणतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रा.प्रदीप ढवळ यांनी केले. स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे : सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
प्रथम : सेक्स ऑन व्हील : नचिकेत पवार, द्वितीय : संकेत पाटील आणि संदेश रणदिवे : चिनाब से रावी तक, तृतीय क्रमांक : राजेश जाधव : गूड बाय किस, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रथम : अक्षता टाले: गूड बाय किस, द्वितीय : साक्षी महिंद्रकर : सेक्स ऑन व्हील, तृतीय : साक्षी आपटे : ब्लुटिक, सर्वोत्कृष्ट अभिनेता :प्रथम : अक्षय खांबे : सेक्स ऑन व्हील, द्वितीय : अनिल आव्हाड : गूड बाय किस, तृतीय : संस्कार चव्हाण : सेक्स ऑन व्हील, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : साई शिर्सेकर: गूड बाय किस, सर्वोत्कृष्ट नेपथ्य : देवाशिष भरवडे: चिनाब से रावी तक
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : रोहन पटेल : गूड बाय किस
सर्वोत्कृष्ट लेखक : नचिकेत पवार : सेक्स ऑन व्हील
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : मानली, सावली: चिनाब से रावी तक.
प्राथमिक फेरीतील सर्वोत्कृष्ट कलाकार, आर्या विनोद, ओंकार शिर्के, मनस्वी लगाडे.असे होते पारितोषिकारचे स्वरूप : सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी प्रथम पारितोषिक ३५ हजार रु. व चषक, द्वितीय पारितोषिक २५ हजार व चषक आणि तिसरे पारितोषिक १५ हजार आणि चषक, सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठी प्रथम २५०० रु. व चषक, द्वितीय क्रमांकासाठी २००० व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी १००० व चषक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्रथम २५०० रु. व चषक, द्वितीय क्रमांकासाठी २००० व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी १००० व चषक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रथम ३००० रु. व चषक, द्वितीय क्रमांकासाठी २००० व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी १००० व चषक, सर्वोत्कृष्ट लेखक (नविन संहितेसाठी) ३००० रु. व चषक, सर्वोत्कृष्ट नेपथ्य ३००० रु. व चषक, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत ३००० रु. व चषक, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना ३००० रु. व चषक.
00000
