मीरा बोरवणकर, अरविंद जगताप, चिन्मय गवाणकर, आभा चौबळ यांच्या मुलाखती घेणार डॉ आनंद नाडकर्णी
अशोक गायकवाड
अलिबाग : विद्यासान एज्युकेशनल फाउंडेशन, अलिबाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH), ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आरसीएफ वसाहतीमध्ये दिनांक १९ जानेवारी २०२५ (रविवार) रोजी वेध अलिबागचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत भूतपूर्व आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, “चला हवा येऊ द्या” चे पत्रलेखक अरविंद जगताप, मायक्रोसॉफ्टचे डायरेक्टर चिन्मय गवाणकर, एकल प्रवासी आभा चौबळ यांसह डिझाईन जत्रा या आगळया सामाजिक-स्थापत्य संस्थेच्या वास्तुविशारदांच्या मुलाखती विख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी घेणार आहेत.
अलिबाग मधील हे दुसरं वेध सम्मेलन. गेल्यावर्षी १४ जानेवारीला झालेल्या शुभारंभाच्या वेध अलिबाग कार्यक्रमात स्थानिक अंध उद्योजक सागर आणि नेत्रा पाटील, निसर्गजीवी रानमाणूस प्रसाद गावडे, पर्यावरणप्रेमी उद्योजिका अमिता देशमुख, अलिबागस्थित हॉलीवूड-बॉलीवूडचे ख्यातकीर्त आर्ट डिरेक्टर दिलीप मोरे आणि भारताचे लेकमॅन म्हणून ओळख असलेले आनंद मल्लिगवड यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. कार्यक्रमा दरम्यान डॉ आनंद नाडकर्णी यांनी ध्येयवादी व्यक्तिमत्त्वांच्या जगण्यातले नेमके मर्म उपस्थितांसमोर उलगडले होते. दिनांक १९ जानेवारी २०२५ (रविवार) रोजी आयोजित वेध-अलिबाग २०२५ ची थीम आहे, ‘रंग-उमंग’. यात भूतपूर्व आयपीएस अधिकारी मिरां चढ्ढा बोरवणकर, संवेदनशील साहित्यिक अरविंद जगताप, कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ चिन्मय गवाणकर, एकल प्रवासी आभा चौबळ आणि डिझाईन जत्रा या सामाजिक-स्थापत्य संस्थेचे वास्तुविशारद विनिता कौर एम. चिरागिया, प्रतीक धनमेर, शार्दुल पाटील अशा विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांच्या जीवनप्रवासाचे रंग उलगडले जाणार आहेत. या सुविख्यात व्यक्तींच्या यशस्वीतेमागची ऊर्जा, उत्साह (उमंग) डॉ नाडकर्णी घेत असलेल्या मुलाखतींच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी अलिबाग परिसरातील विद्यार्ध्यांसह सुजाण नागरिक उत्सुक आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक म्हणून आरसीएफ लिमिटेड तर सह प्रायोजक म्हणून आदर्श नागरी पतसंस्था व गेल (इंडिया) यांचे सहाय्य लाभले आहे. वेध-अलिबागच्या निमित्ताने एक नवे वैचारिक दालन अलिबागकरांसाठी खुले होत असून या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन विद्यासान एज्युकेशनल फाउंडेशन, अलिबाग तर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमातील सहभागासाठी ८६९८७९५७९६ (उमेश वाळंज) किंवा ९८५०९६५४५२ (अनिल आगाशे) यांच्याशी संपर्क साधावा.
00000
