साईनाथ, भामा सी.सी.सह डॅशिंग आणि स्पोर्टिंग युनियन उपांत्य फेरीत
मुंबई, दि. १६ जानेवारी : गतविजेत्या डॅशिंग क्रिकेट क्लबसह भामा सी. सी., साईनाथ आणि स्पोर्टिंग युनियन या संघांनी ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेतील शेवटच्या दोन साखळी लढतींमध्ये भामा सी. सी. ने डॅशिंगवर २५ धावांनी मात करत गटामध्ये अव्वल स्थान मिळवले. तर साईनाथने महाराष्ट्र यंगवर ३२ धावांनी विजय मिळवून पुढे कूच केली. साईनाथ पाठोपाठ स्पोर्टिंगने २ सामने जिंकले असल्याने त्यांचा प्रवेश या आधीच पक्का झाला होता. डॅशिंगने तसे पाहावयास गेले तर दोन लढती जिंकल्या असल्याने त्यांचा प्रवेशही निश्चित होता. उपांत्य फेरीमध्ये भामा विरुद्ध स्पोर्टिंग युनियन आणि डॅशिंग विरुद्ध साईनाथ अशा लढती होतील.
साईनाथ आणि महाराष्ट्र यंग ही लढत फार महत्त्वाची होती. कारण यात विजयी होणाऱ्या संघालाच आगेकूच करण्याची संधी होती. साईनाथने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आणि २० षटकात ३ बाद १५५ अशी चांगली धावसंख्या उभी केली. स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ करणारी सिम्रन डिमेलो (४९) आणि अष्टपैलू निधी घरत (नाबाद ४६) यांनी छान फलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघाच्या जैनी शाह (४२) आणि तितक्याच धावांची नाबाद खेळी करणारी कर्णधार सानया जोशी यांना आवश्यक धावगती राखता न आल्याने महाराष्ट्र यंग ५ बाद १२३ एवढीच मजल मारू शकला. श्रावणी पाटील (२१/२ बळी) आणि श्रीनी सोनी (३३/२ बळी) यांनी उत्तम मारा केला व महाराष्ट्र यंगच्या प्रगतीला खीळ घातली.
भामाची ७ बाद १४८ ही धावसंख्या डॅशिंगला पार करणे कठीण गेले. अष्टपैलू रिया साळुंखे हिने ४१ धावा करण्याबरोबर १८ धावात २ बळी घेत भामाच्या विजयात मुख्य भूमिका बजावली. तिला चांदनी कनोजिया (१४/२ बळी) आणि क्षेत्ररक्षकांची योग्य साथ लाभली.
संक्षिप्त धावफलक
साईनाथ स्पोर्ट्स २० षटकांत ३ बाद १५५ धावा (सिम्रन डिमेलो ४९, निधी घरत नाबाद ४६, सेजल विश्वकर्मा नाबाद २१) विजयी विरुध्द महाराष्ट्र यंग २० षटकांत ५ बाद १२३ धावा (जैनी शाह ४२, सानया जोशी नाबाद ४२, श्रावणी पाटील २१ धावांत २ बळी, श्रीनी सोनी ३३ धावांत २ बळी) सामन्यात सर्वोत्तम : सिम्रन डिमेलो.
भामा सी सी २० षटकांत ७ बाद १४८ धावा (हृदयेशा पाटील २६, रिया साळुंके ४१, नीलाक्षी तलाठी २५ धावांत २ बळी) विजयी विरुध्द डॅशिंग सीसी २० षटकांत ८ बाद १२३ धावा (दिया संघवी ३९, रिया साळुंके १८ धावांत २ बळी, चांदनी कनोजिया १४ धावांत २ बळी) सामन्यात सर्वोत्तम : रिया साळुंके
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *