अशोक गायकवाड
नवी मुंबई : यापुढील काळात महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणा-या विविध सेवासुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘महानगरपालिका आपल्या दारी’ सारखा लोकांपर्यंत जाण्याचा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देत नागरिककेंद्री प्रशासन ही भूमिका नजरेसमोर ठेवून प्रत्येकाने काम करावे असे स्पष्ट संकेत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले.
नवी मुंबईकर नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित सर्व कामे सुलभ व सोप्या पध्दतीने विनासायास व्हावीत याकडे आयुक्त डॉ.कैलास शिंदे विशेष लक्ष देत असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामकाजाला गती देण्यावर भर दिला जात आहे.यामध्ये ‘शून्य प्रलंबितता’ अर्थात ‘झिरो पेन्डसी’ हे सूत्र प्रमाण मानून त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.या अनुषंगाने प्रत्येक विभागामध्ये उपलब्ध असलेल्या नस्ती, कागदपत्रे यांचे डिजीटलायझेशन करण्याचे सूचित करण्यात आले असून कार्यालयांतील उपलब्ध अभिलेखाचे पुनर्विलोकन करणे तसेच शासकीय नियमानुसार अ, ब, क, ड कागदपत्रे स्वरूपात वर्गीकरण करणे याबाबत मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच विहित कालावधीनंतर नष्ट करावयाची कागदपत्रे यांचे निर्लेखन करून ते नियमानुसार नष्ट करण्याची कार्यवाही करावी तसेच जतन करून ठेवावयाचा अभिलेख वर्गवारीनुसार स्वतंत्ररित्या जतन करण्यासाठी मध्यवर्ती अभिलेख कक्षात पाठविण्याची कार्यवाही करण्याचीही प्रक्रिया जलद पूर्ण करून घेण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.सर्व कार्यालयांत अंतर्गत स्वच्छता करण्याची विशेष मोहीम हाती घ्यावी. त्यासोबतच जुन्या फर्निचरची योग्य रितीने विल्हेवाट लावावी असे सूचित करतानाच कार्यालय परिसराचीही स्वच्छता करावी व नीटनेटकेपणावर भर द्यावा तसेच अभ्यागत कक्षाच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची काळजी घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले आहे.कार्यालयांमध्ये कर्मचारी व नागरिकांसाठी स्वच्छ व शुध्द पिण्याची पाणी व्यवस्था व स्वच्छ प्रसाधनगृह व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित करभरणा करणे अथवा इतर कामे सहजपणे व विहित वेळेत व्हावीत यादृष्टीने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क रहावे असे सूचित करीत अधिका-यांनी नागरिकांना कार्यालयात भेटीची वेळ निश्चित करावी, ती ठळकपणे प्रदर्शित करावी व त्या वेळेत नागरिकांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तत्पर कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले.नागरिकांना विविध लोकसेवा पुरविणारी सर्व विभाग कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रे तत्पर असावीत, त्याठिकाणी असलेल्या कर्मचा-यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे असे सूचित करीत नागरिकांना महापालिकेची वेबसाईट तसेच My NMMC ॲपव्दारे मोबाईलच्या एका क्लिकवर करभरणा करण्यापासून एखाद्या समस्येविषयी ग्रिव्हेन्स रिड्रेसल सिस्टीमव्दारे तक्रार दाखल करण्यापर्यंत सर्व सुविधा घरबसल्या उपलब्ध आहेत याची माहिती द्यावी अशा सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या श्रम, मूल्य व वेळेची बचत करण्यासाठी महानगरपालिका विविध ऑनलाईन सुविधा देऊन तत्पर आहे अशा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण करणारे काम करा असे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत.त्या अनुषंगाने कौपरखैरणे विभाग कार्यालयाला अचानक भेट देत आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली व कार्यालयातील अंतर्गत व बाह्य परिसराची स्वच्छता आणि सुधारणा तसेच कार्यालयातील अभिलेखाचे नियमानुसार वर्गीकरण आणि नस्ती, कागदपत्रांची शासकीय सहा गठ्ठे पध्दतीने रचना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यावर परिमंडळ उपआयुक्तांनी आठवडाभरात कार्यवाहीची प्रत्यक्ष तपासणी करावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.नागरिकांना उत्तम दर्जाच्या सेवासुविधा पुरविणे हे आपले कर्तव्य असून त्यादृष्टीने आपले नागरिकांशी सुसंवादी वर्तन असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत यामधूनच आपल्या कार्यालयाची प्रतिमा निर्माण होत असल्याने प्रत्येकाने ही आपल्याला लाभलेली लोकसेवेची संधी असल्याचे लक्षात घेऊन काम करावे असेही आयुक्तांनी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी सुसंवाद साधताना सांगितले. या विभाग कार्यालयाच्या पाहणीमध्ये दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सर्वच विभागांमध्ये करण्यात यावी असेही निर्देशित करण्यात आले. याप्रसंगी शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिमंडळ २ चे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन परिमंडळ २ उपआयुक्त संतोष वारूळे, कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त सुनिल काठोळे, कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे व संजय खताळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
०००००
