भारताचा शेजारी असणारा पण भारताला कायम पाण्यात पाहणारा चीन सतत काही ना काही खोड्या काढून दोन्ही देशातील तणाव कायम वाढवत असतो. हे आताच नाही तर १९६२ पासून चालू आहे. १९६२ साली भारताशी मैत्रीचा हात पुढे करून हिंदी चिनी भाई भाई म्हणत त्याने भारताचा केसाने गळा कापला. त्यानंतरही त्याने भारताच्या सतत खोड्या काढून भारताला त्रास दिला. कधी त्याने भारतात घुसखोरी केली तर कधी त्याने सीमेवर नवीन गावे वसवली तर कधी भारतातील गावांना चिनी नावे देऊन ती गावे चीनच्या हद्दीत असल्याचा दावा केला अर्थात चीनच्या या दाव्याला किंवा खोडसाळपणाला भारताने कधी भीक घातली नाही तरीही त्यांचा खोडसाळपणा कमी झाला नाही उलट वाढतच गेला. मागील वर्षी चीनने भारतातील लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील काही गावांना चीनच्या नकाशात दाखवले होते. या नकाशात त्याने भारतातील लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील काही गावांना चीनमध्ये दाखवले इतकेच नाही तर त्या गावांना चिनी नावे देखील दिली होती. चीनच्या या खोडसाळपणाची भारताने तातडीने दखल घेऊन त्याचा निषेध केला होता. भारताच्या निषेधानंतरही चीन भारताच्या खोड्या बंद करत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे यावेळी चीनने भारताच्या लडाखमध्ये दोन नव्या काऊंट्याची घोषणा करत घुसखोरी केली. पंधरा दिवसापूर्वीच भारताच्या हे लक्षात आले भारतीय लष्कराने आणि परराष्ट्र मंत्रालयाने याचा चीनला जाब विचारला आहे. चीन एवढ्या वरच थांबला नसून चीनने आता भारताशी वॉटर वार सुरू केले असून चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर मोठा जल प्रकल्प सुरू केला आहे या जल प्रकल्पामुळे भारताला भविष्यात मोठ्या जल संकटाला सामोरे जावे लागणार आहे . दुसऱ्यांच्या खोड्या काढून गंमत पाहण्याची चीनची जुनी खोड आहे. अशी खोड तो फक्त भारताचीच काढतो असे नाही तर इतर देशांचीही काढतो मात्र आशिया खंडातील विशेषतः भारताच्या शेजारील काही देशांना त्याने वारेमाप कर्ज देऊन तर काही देशांना धाक दाखवून गप्प बसवले आहे. भारत मात्र त्याच्या या खेळीला बळी पडत नाही म्हणूनच तो अशा खोड्या अधून मधून काढत असतो. भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि लडाखवर चीनचा डोळा आहे इतकेच नाही तर अरुणाचल प्रदेश हा आपलाच भूभाग असल्याचा दावा चीनने अनेकदा केला आहे. मागील वर्षी चीनच्या झाऊझंग येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत भारताने खेळण्यास नकार दिला त्यावेळी चीनने अरुणाचल प्रदेशातील खेळाडूंना स्टेपल व्हिसा दिला होता. स्टेपल व्हिसा देऊन त्यांनी एकप्रकारे भारताला डिवचले होते. त्या आधी लडाखमध्ये चिनी सैन्य घुसवले होते तेंव्हा दोन्ही देशातील सैन्य एकमेकांपुढे उभे ठाकले होते केंव्हाही युद्धास तोंड फुटेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी झालेल्या धुमश्चक्री नंतर चिनी सैन्य भारताच्या हद्दीतून निघून गेले होते. मात्र सीमेवर त्यांच्या हालचाली कायम चालू असतात. मुळात चीन हा जगातला सर्वात कपटी देश आहे. चीनला जगातील महासत्ता व्हायचं आहे त्यासाठी त्याने विस्तारवादी भूमिका स्वीकारली आहे त्यामुळेच तो शेजारील देशांची जमीन आणि मालमत्ता बळकावीत आहे. त्यांच्या या विस्तारवादी धोरणाला जर कोणी आडकाठी आणणार असेल तर तो भारत आहे हे चीन जाणून आहे म्हणूनच तो भारताच्या अशा अधूनमधून खोड्या काढून भारताला त्रास देत असतो अर्थात त्याच्या या खोड्यांना भारत आता बधणार नाही कारण आजचा भारत हा १९६२ चा भारत नसून २०२५ चा भारत आहे. चीनच्या आरे ला कारे करण्याची हिंमत या भारतात आहे त्यामुळेच भारताशी थेट पंगा न घेता अशा छोट्या मोठ्या खोड्या काढून भारताला त्रास देण्याचे धोरण चीनने अवलंबले आहे.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *