६८ वी शामराव ठोसर स्मृती क्रिकेट स्पर्धा
ठाणे : सागर मिमरोटची भेदक गोलंदाजी, प्रणव यादवच्या शतकी खेळीसह दुसऱ्या बळीसाठी केलेली ११७ धावांच्या शतकी भागीदारीमुळे डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनने डेक्कन क्रिकेट फाऊंडेशनचा २११ धावांनी धुव्वा उडवत स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित ६८ व्या शामराव ठोसर स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. प्रथम फलंदाजी करताना २९५ धावांचे आव्हान उभे केल्यावर डेक्कन क्रिकेट फाऊंडेशनला ८४ धावांत गुंडाळत डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनने स्पर्धेतील वाटचाल कायम राखली.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा कर्णधार आदित्य शेमाडकरचा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. डोंबिवली क्रिकेट क्लबच्या सलामीच्या देव तेंडुलकर आणि प्रणव यादवने पहिल्या गडयासाठी ८५ धावांची भागीदारी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला .वेद ३५ धावांवर बाद झाल्यावर प्रणवने मंदार चौधरीसह दुसऱ्या गड्यासाठी ११७ धावांची शतकी भागीदारी रचत संघाच्या धावसंख्येला बळकटी दिली. प्रणवने ८६ चेंडूत अठरा चौकार आणि एक षटकार ठोकत १०८ धावा केल्या. तर मंदारने ७३ धावा बनवल्या.
या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सागर मिमरोटच्या गोलंदाजीसमोर डेक्कन क्रिकेट फाऊंडेशनचा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. त्यांच्या रोनील जाधव ३२आणि आदित्य तिवारीच्या २३ धावांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दोन आकडी धावा करता आल्या नाहीत. सागरने २.५ षटकात एका निर्धाव षटकासह अवघ्या दोन धावांच्या मोबदल्यात आठ फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक : डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन : ३९.५ षटकात सर्वबाद २९५ (प्रणव यादव १०८, १८ चौकार, एक षटकार, मंदार चौधरी ७३ (९चौकार), राहुल सिंग ८-६८-४, रोशन गडकर ८-४५-२, रोनील जाधव ५-४८-२) विजयी विरुद्ध डेक्कन क्रिकेट फाऊंडेशन : १९.८ षटकात सर्वबाद ८४ ( रोनील जाधव ३२, आदित्य तिवारी २३, सागर मिमरोट २.५-१-२-८, प्रतीक जयस्वाल ४-१५-२).
00000
