गावित यांचे गौरवोद्गार
जी. एन. एम नर्सिंग विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा
योगेश चांदेकर
पालघरः नर्सिंग हा व्यवसाय नसून मानवतेची सेवा करण्याचे हे व्रत आहे. जगभरातच सध्या नर्सिंग स्टाफचा तुटवडा असून पालघर येथील ‘देव मोगरा फाउंडेशन ट्रस्ट’ संचलित ‘सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स’च्या विद्यार्थ्यांना भारताबरोबरच परदेशातही उत्तम व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची संधी आहे. ते पालघरचे नाव जगभरात उंचावतील, असा विश्वास आमदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला.
‘देव मोगरा फाउंडेशन ट्रस्ट’च्या व ‘सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स’च्या प्रथम वर्षाच्या जी.एन. एम. नर्सिंग विद्यार्थ्यांच्या शपथविधी सोहळ्यात गावित प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी बोईसरचे आमदार विलास तरे, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी, माजी नगराध्यक्ष उज्वला काळे, शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे, संस्थेचे अध्यक्ष शांताराम वळवी, सचिव जतिन संखे, उपाध्यक्ष रूपाली गावित, सदस्य रोहित गावित आदी उपस्थित होते.
प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गावित यांनी फ्लॉरेन्स नाइंटिगेल यांच्या परिचारिका सेवेच्या व्रताचा पाया तसेच मुंबईतील काशीबाई गणपत या पहिल्या परिचारिकेने आरोग्य सेवेतील दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. पालघर जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षात पाच हजार एक्केचाळीस मुलाचे मृत्यू कुपोषण आणि पुरेशा उपचाराअभावी झाले. त्याला केवळ आरोग्य विभाग जबाबदार नसून प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि तंत्रज्ञनाचा अभाव हे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
माता, बाल मृत्यूचे प्रमाण
नाशिक जिल्ह्यातील कळवण, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ, अमरावती परिसरातील चिखलदरा तसेच गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातही पालघर जिल्ह्यासारखीच स्थिती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही. त्यांची चूक आहे, तिथे बोलले पाहिजे, त्याचबरोबर त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या पाहिजेत, ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण घेतलेले पुरेसे कर्मचारी मिळत नाही, ही शासनाची अडचण आहे, असे गावित म्हणाले.
दक्षिणेतील परिचारिका जगभर
दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू या राज्यात परिचारिकांचे प्रमाण मोठे आहे. सेवाभाव हा त्यांच्या वृत्तीत आहे. त्यामुळे आखाती देशात तसेच आपल्या देशातही विविध ठिकाणच्या रुग्णालयात केरळ आणि तामिळनाडूच्या परिचारिकांचे प्रमाण मोठे आहे, असे निदर्शनास आणून गावित म्हणाले, की  आता आपल्याकडे हे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी एकट्या कुटंबात वृद्धांची सेवा करण्यासाठी आता परिचारिकांना मागणी आहे. परिचारिकांची कामगिरी ही केवळ पैशात मोजाली जाणारी नाही, तर त्यापेक्षा खूप महत्त्व आहे. समाजसेवेतील ते एक महत्त्वाचे कार्य आहे.
हिरो आणि समाजाची आई!
परिचारिका ही रुग्णांसाठी केवळ सिस्टर नसून ती सेवाभावाने काम करणारी आई असते. रुग्णांची काळजी घेण्यासोबतच त्यांना सावरण्यास मदत करीत असते. त्यामुळे पॅरामेडिकल स्टाफ हा खऱ्या अर्थाने समाजाचा ’हिरो’ असतो. समर्पण, मेहनत, कौशल्य हे जर असेल तर कोठेही चांगली नोकरी मिळू शकते. आणि तंत्रज्ञानाच्या बदलाबाबत तुम्ही सातत्याने सतर्क राहा आणि स्वतःला अपडेट करत राहा, असा सल्ला गावित यांनी दिला. पालघर आणि राज्याचे नावही ‘देव मोगरा फाउंडेशन ट्रस्ट’च्या ‘सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग’चे विद्यार्थी जगात उज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भविष्यातही उत्तम संधी
या वेळी आमदार तरे म्हणाले, की नर्सिंग हे सेवाभावी क्षेत्र आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता भविष्यातही नर्सिंग क्षेत्राला उत्तम संधी निर्माण होणार आहेत. नर्सिंग क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संवेदनाशील, दक्ष, शिस्तप्रिय व समाजसेवी वृत्तीचे असणे महत्त्वाचे आहे. या वेळी बाळासाहेब पाटील यांनीही फ्लॉरेन्स नाईंटिंगेल यांच्या कार्याचा तसेच मदर तेरेसा यांच्या कार्याचा गौरव करताना परिचारिकांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित केले. या क्षेत्राला भावी काळातही मोठा वाव आहे असे त्यांनी सांगितले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *