भारतातील आयटी क्षेत्रातील नामांकीत कंपनी असलेल्या ‘इन्फोसिस’ने तिसऱ्या तिमाहीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. ‘इन्फोसिस’ने तिसऱ्या तिमाहीमध्ये 6806 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. ‘इन्फोसिस’चा तिसऱ्या तिमाहीतील महसूल 41 हजार 764 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 तुलनेत ‘इन्फोसिस’च्या नफ्यात तिसऱ्या तिमाहीमध्ये 11.46 टक्क्यांची वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर ‘इन्फोसिस’कडून येत्या आर्थिक वर्षात वीस हजार जणांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत.‘इन्फोसिस’ने तिसऱ्या तिमाहीच्या म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान 5591 जणांना नव्याने नोकरी दिली आहे. सध्या ‘इन्फोसिस’मधील कर्मचाऱ्यांची संख्या तीन लाख 23 हजार 379 रुपये झाली आहे. कंपनीने सलग दुसऱ्या तिमाहीमध्ये कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या आकडेवारीत वाढ नोंदवली आहे. ‘इन्फोसिस’ने येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2025-26 मध्ये 20 हजार फ्रेशर्सना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
15 हजार फ्रेशर्सना नोकऱ्या
‘इन्फोसिस’चे ‘सीएफओ’ जयेश संघराजका यांनी म्हटले की, आम्ही चालू आर्थिक वर्षात फ्रेशर्सच्या भरतीसाठी मनुष्यबळाचा आढावा घेत आहोत. या आर्थिक वर्षात 15 हजारांपेक्षा जास्त फ्रेशर्सना नोकरी दिली जाईल. येत्या आर्थिक वर्षात ती संख्या 20 हजारांपर्यंत जाईल. ‘इन्फोसिस’ने 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 11 हजार 900 जणांना नोकरी दिली होती. त्यापूर्वीच्या म्हणजेच 2022-23 मध्ये 50 हजार फ्रेशर्सना कंपनीत भरती करुन घेण्यात आले होते.
पगारवाढही करणार
संघराजका यांनी सहा ते आठ टक्के वेतनवाढीची शक्यता व्यक्त केली आहे. ‘इन्फोसिस’ला अपेक्षित असलेल्या फायद्यापेक्षा अधिक फायदा तिसऱ्या तिमाहीमध्ये मिळवला आहे. कंपनीचा युरोप आणि अमेरिकेतील व्यवसायदेखील चांगल्या प्रकारे नफा मिळवून देत आहे.
‘टीसीएस’मध्ये कर्मचारीघट
‘टाटा कन्सलटन्सी’मध्ये तिसऱ्या तिमाहीमध्ये 5370 कर्मचाऱ्यांची घट झाली आहे. ‘एचसीएल टेक’ने 2134 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.
ऐंशी टक्के लोक नव्या नोकरीच्या शोधात
भारताच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबरच रोजगाराच्या समस्यादेखील निर्माण होत आहेत. मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांचे संकट आहे. एका अहवालानुसार भारतात दर 10 पैकी 8 लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत. अर्ध्याहून अधिक म्हणजे 55 टक्के लोक म्हणतात, की नवीन वर्षात नोकरी शोधणे अधिक कठीण झाले आहे. ‘लिंक्डइन’ने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. भारतातील 69 टक्के एचआर व्यावसायिकांचा विश्वास आहे की कुशल कर्मचारी शोधणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाले आहे. याचा अर्थ 2025 मध्ये नोकऱ्या शोधण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. गेल्या वर्षीही नोकरी शोधणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. असे असूनही 58 टक्के लोकांना आशा आहे की या वर्षी नोकरीच्या क्षेत्रात सुधारणा होईल आणि त्यांना नवीन नोकरी मिळू शकेल.
तरुणांमध्ये कौशल्याचा अभाव
अनेक लोक एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करत आहेत. 49 टक्के लोक पूर्वीपेक्षा जास्त नोकऱ्यांसाठी अर्ज करत आहेत; मात्र त्यांना कमी प्रतिसाद मिळत आहेत. 27 टक्के एचआर व्यावसायिक दररोज तीन ते पाच तास अर्ज पाहत असतात तर 55 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये आवश्यक कौशल्ये दिसत नाहीत.
*‘लिंक्ड इन इंडिया’ अहवाल
भारतीयांनी नोकरी शोधण्याच्या पद्धतीत विचारपूर्वक बदल करण्याची आवश्यकता आहे. भारतातील 60 टक्के लोक नवीन क्षेत्रात काम करण्यास तयार आहेत. 39 टक्के या वर्षी नवी कौशल्ये शिकण्याची तयारी करत आहेत. भविष्यात बहुतांश नोकऱ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ‘लिंक्ड इन’ने तीन नवीन क्षेत्रांचे वर्णन केले आहे, जे सर्वाधिक नोकऱ्या देतात. यामध्ये एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर, रोबोटिक्स टेक्निशियन आणि क्लोजिंग मॅनेजर यांचा समावेश आहे.