१९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत पाकिस्तान आणि दुबई येथे एकदिवसीय सामन्यांची चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर व कर्णधार रोहित शर्मा यांनी यांनी १८ तारखेला १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. या संघात रोहित शर्मा व युवा शुभमन गिल हे भारताचे अनुभवी आणि युवा खेळाडू भारताच्या डावाची सुरवात करतील. विशेष म्हणजे हे दोघे या संघाचे कर्णधार आणि उपकर्णधार आहेत यांच्यासोबत तिसरा सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वाल ची निवड करण्यात आलेली आहे. मधल्या फळीची जबाबदारी अनुभवी विराट कोहली, , श्रेयस अय्यर, के एल राहुल तसेच यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्यावर टाकण्यात आली आहे अनुभवी के एल राहुल हा अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडेल. विशेष म्हणजे दोघेही उत्तम फिनिशर म्हणून आपली जबाबदारी पार पाडतात. भारताची फलंदाजी अतिशय बलवान असून रोहित, शुभमन व विराट हे पहिल्या तीन क्रमांकाचे फलंदाज जगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. एकदिवसीय सामन्यात या तिघांची कामगिरी उत्तम असून तिघेही एकदिवसीय सामन्यातील श्रेष्ठ फलंदाज समजले जातात. भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात तसेच मागील वर्षी वेस्ट इंडिज मध्ये झालेल्या टी २० विश्वचषकात तिघांनीही चांगली कामगिरी केली आहे. या तिघांची कसोटीतील कामगिरी त्यांच्या लैकिकास साजेशी झालेली नाही त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असली तरी मर्यादित षटकांच्या सामन्यात त्यांची कामगिरी नजरेत भरणारी आहे. सध्या जरी ते त्यांच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसतील तरी ते या स्पर्धेत पुन्हा आपल्या पूर्वीच्या फॉर्ममध्ये येऊ शकतात ते जर पुन्हा फॉर्मात आले तर चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याच्या भारताच्या आशा पल्लवित होतील. चौथ्या क्रमांकावर युवा श्रेयस अय्यर येईल. भारताचा तो भरवशाचा फलंदाज असून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने पाचशे पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. तो फ्लॉप गेला तर त्याची जागा के एल राहुल घेईल. तो मैदानात सर्वत्र फटकेबाजी करू शकतो. तोही भारताचा भरवशाचा फलंदाज मानला जातो. त्यानंतर ऋषभ पंत हा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज मैदानात येईल. तो स्फोटक फलंदाज असून मॅच फिनिशर आहेत. कमी चेंडूत जास्त धावा काढून संघाला विजय मिळवून देण्यात त्याचा हातखंडा आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या हा जगातील सध्याचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू येईल. तो गोलंदाजी, तडाखेबंद फलंदाजी आणि प्रभावी क्षेत्ररक्षण करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावतो. त्याने आपल्या अष्टपैलू खेळीने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. वॉशिंग्टन सुंदर हा आणखी एक अष्टपैलू खेळाडू भारतीय संघात आहे. ऑफस्पिन गोलंदाजी आणि तडाखेबंद फलंदाजी हे त्याचे वैशिष्ट्ये आहे. गोलंदाजीमध्ये निवड समितीने तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली असून अनुभवी रवींद्र जडेजा सोबत फॉर्मात असलेला चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेल यांना संधी मिळाली आहे. तिघेही डावखुरे मंदगती गोलंदाज आहेत त्यामुळे मंदगती गोलंदाजीत विविधता नसल्याची टीका टीकाकार करीत असले तरी तिघेही फॉर्ममध्ये आहे. जडेजा हा भारताचा सर्वोत्तम मंदगती गोलंदाज आहे शिवाय तो फलंदाजीही करतो आणि चांगला क्षेत्ररक्षक आहे म्हणजे तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. कुलदीप यादव जरी डावखुरा असला तरी तो चायनामन गोलंदाज आहे आणि विशेष म्हणजे तो फॉर्ममध्ये आहे.
फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूला संधी देणे केंव्हाही चांगले. अक्षर पटेल गोलंदाजीसोबत फलंदाजीही करू शकतो त्याची फलंदाजी भारतासाठी बोनस ठरेल. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी या अनुभवी वेगवान गोलंदाजांसोबत अर्शदिप सिंग या युवा गोलंदाजाला देखील निवड समितीने संधी दिली आहे. निवड समितीने या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला संधी देऊन वेगवान गोलंदाजीत विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचे महत्व अनन्यसाधारण आहे. २०११ साली झहीर खान या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी करून भारताला विश्वचषक मिळवून दिला होता इतकेच नाही तर मागील वर्षी भारताने जिंकलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत अर्शदीप सिंगनेच सर्वाधिक बळी मिळवले होते. डावाच्या शेवटी म्हणजे डेथ ओव्हरमध्ये अर्शदिप सिंगची गोलंदाजी प्रभावी ठरते. निवड समितीने निवडलेला हा संघ चांगला आहे. जुन्या आणि नव्या खेळाडूंना संधी देत जोश आणि होश यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न निवड समितीने केला आहे त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही ठरले आहेत. चॅम्पियन ट्रॉफिसाठी निवडण्यात आलेला हा संघ संतुलित आहे हे मान्य करून नीवड समितीचे याबाबत अभिनंदन करावे लागेल. आता जबाबदारी आहे ती निवडण्यात आलेल्या या १५ खेळाडूंची. २०१३ नंतर भारताला चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरण्यात अपयश आले आहे. हे अपयश झटकून नव्याने सुरवात करण्याची संधी या निमित्ताने या संघाला मिळणार आहे. १९९८ साली सुरू झालेली ही स्पर्धा भारताने २००२ आणि २०१३ साली जिंकली होती तर २०१७ साली भारत या स्पर्धेचा उपविजेता होता. या स्पर्धेसाठी निवड झालेले सर्व खेळाडू अनुभवी आहेत. एकदिवसीय सामने खेळण्याचा सर्वांना मोठा अनुभव आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही स्पर्धा पाकिस्तानात होणार असली तरी भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहे. संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंना दुबईत खेळण्याचा चांगला अनुभव आहे त्यामुळे देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करून भारताला १२ वर्षांनंतर चॅम्पियन ट्रॉफी जिंकून देण्याची जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील अशी आशा करूया. भारतीय संघाला एकदिवसीय चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५