महाराष्ट्रातला बीड जिल्हा आणि त्यातल्या त्यात मस्साजोग हे गाव गेल्या ४१ दिवसांपासून देशभर गाजते आहे. त्यातही आता या प्रकरणातील प्रमुख पात्र असलेले वाल्मीक कराड हे नाव सर्वांच्या तोंडोतोंडी झालेले आहे.
तरीही हा वाल्मीक कराड कोण असा प्रश्न काही महाभाग विचारतील. म्हणून सांगतो, बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २००४ रोजी निर्घृण हत्या झाली.८ डिसेंबरला त्यांचे अपहरण करण्यात आले होते, आणि ९ डिसेंबरला त्यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह गावाबाहेर सापडला. हे प्रकरण सर्वत्र तर गाजलेच, पण महाराष्ट्राचे विधीमंडळ आणि देशाची संसद येथेही चर्चिले गेले.
विशेष म्हणजे १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतलेले धनंजय मुंडे या मंत्र्याचा राजीनामाही मागितला गेला. आजही तो मागितला जातो आहे. याला कारण काय तर वाल्मीक कराड.
वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे, आणि संतोष देशमुखच्या हत्येत वाल्मीक कराडचा हात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे वाल्मीक कराडला सीआयडीने ताब्यात घेतले आणि आता त्याच्यावर मकोकाही लावण्यात आला आहे.
वाल्मीक कराड हा वंजारा समाजाचा एक कार्यकर्ता आहे. सुरुवातीला हा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या घरी हारकाम्या म्हणून कार्यरत होता असे बोलले जाते.त्या काळात गोपीनाथजींचा पुतण्या धनंजय मुंडे हा देखील गोपीनाथजींच्याच मार्गदर्शनात राजकारणाचे प्राथमिक धडे गिरवीत होता. तिथेच धनंजय आणि वाल्मीक यांचे संबंध आले. धनंजय मुंडे पुढे आमदार झाले. आमदार झाल्यावर त्यांना पंख फुटले आणि ते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी वाल्मीक देखील त्यांच्यासोबत गेला. धनंजय मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाल्मीक देखील राजकारणात सक्रिय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा तो सक्रिय कार्यकर्ता बनला. पुढे तो पक्षाचा पदाधिकारीही बनला. धनंजय मुंडेंसोबत तो २०२२मध्ये अजितदादांच्या तंबूत गेला आणि बीड जिल्हा लाडकी बहीण योजना समितीचा तो जिल्हाध्यक्षही बनला.
याच दरम्यान वाल्मीक कराडचा जसा राजकीय विकास झाला तसाच आर्थिक विकासही झाला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्याचा मुख्य उद्योग खंडणीचा होता. या खंडणीच्या व्यवसायातूनच त्याने संतोष देशमुखचा खून घडवून आणला असे बोलले जाते आहे.
मस्साजोगजवळ आवादा कंपनीने पवनचक्की उभारली होती. या कंपनीकडून वाल्मीक ने दोन कोटी रुपये खंडणी मागितली असल्याचा आरोप करीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रारही दिली होती. त्यातील ५० लाख रुपये वाल्मीकने वसूलही केले होते. अशा प्रकारे खंडणी मागितल्यामुळे हा प्रकल्प वांध्यात येईल आणि त्यामुळे आपल्या गावातील रोजगारावर परिणाम होईल म्हणून संतोष देशमुखने वाल्मीकला विरोध केला. त्यातूनच वाल्मिकने संतोषचे हत्याकांड घडवून आणले असे बोलले जाते आहे.
संतोषचा ून घडवून आणण्यात वाल्मीकचा हात होता असे थेट पुरावे सध्या तरी कोणाजवळ नसावेत. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळेच लोक यात वाल्मीकचा हात आहे आणि त्याला धनंजय मुंडेंचा आशीर्वाद आहे असा आरोप केला जात आहे. त्यामुळे वाल्मीक पोलिसांच्या ताब्यात आल्यावर त्याची चौकशी सुरू झाली. त्याला मकोका लागला. आता तो पोलीस कस्टडीत आहे. या काळात त्याने जमवलेल्या मालमत्तेचे रोज नवे नवे आकडे येत आहेत. बीडमध्ये तर त्याचे घरदार आणि शेतीवाडी झाली आहेच. पण पुण्यात आणि मुंबईत पॉश सोसायटीत अनेक निवासी आणि व्यावसायिक गाळे त्याच्या स्वतःच्या पहिल्या पत्नीच्या आणि दुसऱ्याही पत्नीच्या नावावर असल्याची माहिती दररोज समोर येते आहे. आता तर परदेशातही त्याची मालमत्ता असल्याची चर्चा आहे.
यातून एक प्रश्न निर्माण असा होतो की राजकारणात आल्यावर माणसाजवळ इतका पैसा कसा आणि केव्हा जमा होत असावा? इथे सामान्य माणसाला आयुष्यभर घाम गाळल्यानंतर गावाबाहेर कुठेतरी कसेबसे दोन खोल्यांचे घर घेता येते. तोच माणूस राजकारणात आला तर दहा वर्षात रंकाचा राव झालेला दिसतो. वाल्मीक कराडचा अधिकृत धंदा कोणता हे कोणीही सांगत नाही. मात्र तो खंडणीचा उद्योग करायचा असे सगळे सांगतात. आज राजरोसपणे खंडणी घ्यायची तर कोणाचातरी राजकीय वरदहस्त असावाच लागतो. आता तो धनंजय मुंडे यांचाच आहे असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. आणि जोवर ठोस पुरावा मिळत नाही तोवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असे त्यांचे नेते अजित दादा पवार यांनी स्पष्ट केले आहे. जर धनंजय मुंडे यांचा पाठिंबा नसेल तर वाल्मीक कराडने एवढी संपत्ती कशाच्या भरवशावर जमवली हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निश्चित येईल. गेल्या आठ दिवसापासून त्याच्या मालमत्तांच्या नव्या नव्या बातम्या कानावर येत आहेत. ते बघता वाल्मीक किमान ३० ते ४० कोटीचा धनी निश्चित आहे हे दिसून येते. इथे आयुष्यभर घासल्यावर पाच-पन्नास लाखाची कमाई जेमतेम होते. मग वाल्मीक ने ही कमाई कशाच्या जोरावर केली? हा सर्व पैसा राजकीय आशिर्वादाने अवैध मार्गाने जमवला जातो.
अशा कथित अवैध प्रकारांमुळेच सामान्य माणसाचा राजकारणावरचा विश्वास उडतो. आज अशी अनेक उदाहरणे सापडतील की आयुष्य राजकारणात घालवले आणि शेवटी कंगाल होऊन गोवऱ्या स्मशानात नेल्या. काँग्रेसच्या राजवटीत देशाचे गृहमंत्री राहिलेले आणि दोनदा काळजीवाहू पंतप्रधान राहिलेले गुलजारीलाल नंदा हे राजकारणातून निवृत्त झाल्यावर दिल्लीला डिफेन्स कॉलनीत एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यांनी निवृत्तीनंतर कोणताही शासकीय लाभ घेतला नव्हता. पैशाअभावी एकदा त्यांच्या घरमालकाने त्यांचे सामान घराबाहेर फेकले. एका पत्रकाराने ही बातमी छापल्यावर तत्कालीन केंद्र सरकार जागे झाले आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था झाली. भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष कुषाभाऊ ठाकरे हे अखेरपर्यंत एका खोलीत राहत होते. त्यांच्यानंतर त्यांची मालमत्ताही काही पुस्तके एवढीच होती. असाच प्रकार माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचा होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कितीतरी प्रचारक आयुष्यभर देशासाठी आणि संघासाठी सर्वस्व सोडून आयुष्य जगलेले आपण बघतोच आहोत. ही अशी उदाहरणे डोळ्यासमोर असतानाही अशी वाल्मीक कराड सारखी उदाहरणे का बघायला मिळतात हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात भेडसावतोच. आज सामान्य माणूस असलेला कार्यकर्ता साधा नगरसेवक जरी झाला तरी पाच वर्षात चारचाकीत फिरतो. आमदार खासदार झाल्यावर तर विचारायलाच नको? अशांची मग वारेमाप संपत्ती जमा होते.
असे प्रकार कुठेतरी थांबायला हवेत असे वाटत नाही का? आज राजकारण हे अतिशय गढूळ झालेले आहे. राजकारणाचे शुद्धीकरण व्हायला हवे असे प्रत्येकालाच वाटते. मात्र सुरुवात कोणी करायची हा खरा प्रश्न येतो. सुरुवात कोणीच करत नाही आणि मग राजकारणात कार्यकर्ते येऊन ते संधी मिळताच वाल्मीक कराड बनतात. हे सर्व अवैध मार्गानेच होते.यामुळेच सुसंस्कारित सामान्य माणूस राजकारणापासून दूरच राहतो. पॉलिटिक्स इज ए गेम ऑफ स्काउंडरल्स असे म्हटले जाते. ते यथार्थ आहे हे वाल्मीक कराडच्या उदाहरणाकडे बघितल्यावर लक्षात येते.
यातून एकूणच समाजमनाने काहीतरी बोध घ्यायला हवा आणि राजकारणाचे शुद्धीकरण कसे होईल हा प्रयत्न करायला हवा. वाल्मीक कराड प्रकरणाचा हाच अन्वयार्थ काढता येईल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *