शाहीर संभाजी भगत, प्रा. आर. रामकुमार, आईशी घोष यांचा सहभाग
अनिल ठाणेकर
ठाणे : महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने मुंबईत हार्मनी आणि कॅम्पस डेमोक्रसी या विषयावरील राष्ट्रीय विद्यार्थी संमेलन यशस्वीपणे संपन्न झाले यात शाहीर संभाजी भगत, प्रा. आर. रामकुमार, आईशी घोष यांनी आपला सहभाग नोंदविला होता.
सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे हार्मनी आणि कॅम्पस डेमोक्रसी या विषयावर राष्ट्रीय विद्यार्थी संमेलन यशस्वीपणे संपन्न झाले. या संमेलनाने शिक्षण अभ्यासक, कलाकार, पत्रकार आणि विद्यार्थी यांना एकत्र आणले. तसेच एकोपा आणि कॅम्पस लोकशाहीसाठी एकत्र येण्याचा संकल्प केला. या संमेलनात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे (आयआयटी बॉम्बे), मुंबई विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस), अमेठी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, यांच्यासह महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कॅम्पस लोकशाही’ या विषयावरील पॅनेलमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना, प्रा. आर. रामकुमार यांनी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या अभिव्यक्तीवर येणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकला आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी विद्यार्थी संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक वृत्तीची गरज व्यक्त केली. जेएनयू विद्यार्थी संघाच्या माजी अध्यक्ष आईशी घोष यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सह भारतीय विद्यापीठांच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष चारित्र्याशी थेट तडजोड करणाऱ्या भाजप सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पॅनेलचे अध्यक्षपद भूषवताना लेखक डॉ. नितीश नारायणन यांनी देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांची उदाहरणे मांडली. ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या सर्वसमावेशक कॅम्पस लोकशाहीसाठी आणि त्यांच्या आवाजासाठी परिसरात जागा निर्माण केली, त्यांचे कौतुक केले. सुप्रसिद्ध संगीतकार शाहीर संभाजी भगत यांनी ‘आर्टिस्ट्स फॉर हार्मनी ॲण्ड बियॉन्ड’ या पॅनेलला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणावर आणि सांस्कृतिक-राजकीयदृष्ट्या एकता आणि लोकशाहीची हाक देण्याची गरज याविषयी माहिती देऊन समृद्ध केले. कलाकार व विद्यार्थी नेत्या दिपसिता धर यांनी समरसता आणि विविधतेचा संदेश देण्यासाठी चित्रपट आणि संगीताच्या मुख्य प्रवाहातील मंचचा वापर करण्याचे आवाहन केले. तर अध्यक्ष सृजन भट्टाचार्य यांनीही मोठ्या लोकांपर्यंत राजकीय संदेश पोहोचवण्यासाठी कला आणि कलाकारांचे महत्त्व ओळखले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने राज्यव्यापी ‘एकता प्रश्नमंजुषा’ आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये विजेत्यांना आकर्षक पारितोषिक रकमेसह इतर आकर्षक स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. या संमेलनात सफदर हाश्मी मेमोरियल ट्रस्ट (सहमत) द्वारे ‘विवादाच्या पलीकडे: लँडस्केप्स ऑफ डिसेंट’ हे कला प्रदर्शन देखील प्रदर्शित करण्यात आले. ज्याचे उद्घाटन प्रसिद्ध कलाकार उत्तम घोष यांनी केले. संमेलनाच्या समारोपीय सत्रात लोक सांस्कृतिक मंच, मुंबई यांचे सांस्कृतिक सादरीकरण झाले. टीआयएसएस आणि जय भीम नगर, मुंबई येथील विद्यार्थ्यांनीही संमेलनामधील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमस्थळी प्रगतीशील साहित्य आणि चळवळीच्या इतर साहित्याचे स्टॉल लावण्यात आले. एसएफआयचे महासचिव मयुख बिस्वास आणि राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. पी. सानू हेही विद्यार्थी संमेलनात सहभागी झाले होते. संमेलनाचा समारोप करताना, स्टुडंट्स फॉर डेमोक्रसीच्या वतीने रोहिदास जाधव आणि रामदास प्रिनी शिवानंदन यांनी समरसता आणि कॅम्पस लोकशाहीसाठी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. द्वेष आणि जातीयवादाच्या राजकारणाविरोधात विद्यार्थी वर्गाला एकत्र आणण्यासाठी आणि कॅम्पस लोकशाहीसाठी विद्यार्थी संघटनांना एकत्र करण्यासाठी असे कार्यक्रम आणि मेळावे महाराष्ट्रभर सुरूच राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. स्टुडंट्स फॉर डेमोक्रसी इतर सर्व संस्था आणि पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मूल्ये असलेल्या व्यक्तींनाही समरसतेचा आणि कॅम्पस लोकशाहीचा संदेश देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन रोहिदास जाधव, सोमनाथ निर्मळ & रामदास प्रिनी शिवनंदन या एकता एक्सप्रेस @ मुंबई आयोजन समितीने केले आहे.