अशोक गायकवाड
पालघर : विविध शेती उपयोगी योजनांचा लाभ घ्यावा व कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शेतकऱ्यांना केले आहे. विविध योजनेचा लाभ देण्याकरीता प्राथमिक टप्यांत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या नेतृत्वात व रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांच्या उपस्थितीत मे. टाटा मोटार्स (सीआरएस) यांच्यासोबत सांमज्यस्य करार १४ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आला, त्यानुसार पालघर जिल्हयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत टाटा मोटर्स (सीआरएस) यांनी कृषी विभागाच्या अभिसरणातून १ एकर लाभार्थी यांना एकत्रित (आंबा ५० रोपे व काजू ५० रोपे व १०० बांबू रोपे वाटप करण्यात आले आहेत. सदर लाभार्थ्यांना टाटा मोटार्स मार्फत प्रशिक्षण देण्यात आले असून त्याबाबत योग्य पद्धतीने लागवड व संगोपन करण्याचे नियोजन केल आहे.आजपर्यंत मग्रारोहयो अंतर्गत टाटा मोटार्स व कृषी विभागामार्फत १ हजार ४१० हेक्टर वर एकूण ३ हजार ६९२ लाभार्थी यांना लाभ देण्यात आले असून सदर लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत मनरेगा मधून १०० टक्के अनुदान पुढील ३ वर्ष देण्यात येणार आहे. तसेच नियोजित कार्यक्रमामधुन मग्रारोहयो अंतर्गत १ हजार ८२८ हेक्टरवर ४ हजार ५५४ लाभार्थ्यांना फळबाग लाभ देण्यात आला आहे.
पालघर जिल्हयात एकत्रित ३ हजार २३८ हेक्टर वर एकूण ८ हजार २४६ लाभार्थ्यांना विक्रमी फळबाग योजनेचा लाभ देण्यात आला आहे, सदर योजने अंतर्गत सर्व लाभार्थ्याना पूढील ३ वर्ष १०० टक्के अनुदान देण्यात येऊन शेतकऱ्यांना फळबाग लागवडीतून उत्पन्न वाढ होऊन आर्थिक स्थैर्य लाभण्यास मदत होईल. राज्यातील महत्त्वाकांक्षी सी एम बांबू मिशन प्रकल्पामध्येही पालघर जिल्हयातील शेतकऱ्यांना उच्च प्रजातीचे बांबू रोपे सलग व बांधावर लागवडीकरीता उपलब्ध करून देण्यात आली असून या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढील ४ वर्षात व्यावसायिक बांबूचे उत्पादन सुरु होण्यास मदत होईल. जिल्हयात आजतागायत १हजार ४९५ हेक्टरवर ५ हजार २८२ लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून यापुढेही लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. मनरेगा केवळ मागेल त्याला अकुशल काम व त्यातून दैनंदिन मजूरी मिळविणे असे जुने स्वरुप राहिले नसून मनरेगातील वैयक्तिक लाभाच्या कामांचा लाभ घेऊन कुटूंब लखपती होऊ शकते व त्यायोगे सर्वांगिण समृध्द होऊ शकते. जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी मगांराग्रारोहयो विभागामार्फत फळबाग, बांबू लागवड, बरोबरीने विविध शेती उपयोगी योजनांचा लाभ घ्यावा व कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
